जाहिरात

SIR: घराघरात पोहोचणार यंत्रणा! मतदार यादी शुद्धीकरणासाठी आयोगाची 'स्पेशल' मोहीम नेमकी आहे तरी काय?

Maharashtra Voter List Revision 2026: महाराष्ट्रातील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करण्याची आता मोठी संधी चालून आली आहे.

SIR:  घराघरात पोहोचणार यंत्रणा! मतदार यादी शुद्धीकरणासाठी आयोगाची 'स्पेशल' मोहीम नेमकी आहे तरी काय?
Maharashtra Voter List Revision 2026 : राज्य निवडणूक आयोगानं याबाबतचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
मुंबई:

Maharashtra Voter List Revision 2026: महाराष्ट्रातील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करण्याची आता मोठी संधी चालून आली आहे. कारण, भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मतदार यादीची विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम सुरू झाली आहे. गेल्या 20 वर्षांत अशी मोहीम राबवण्यात आली नव्हती, त्यामुळे यावेळेस होणारी ही प्रक्रिया ऐतिहासिक मानली जात आहे. संविधानाच्या कलम 328 अंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात असून, मतदार यादीतील सर्व चुका दुरुस्त करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

घराघरात येणार निवडणूक अधिकारी

राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या तपशिलाची खातरजमा केली जाणार आहे. यासाठी तब्बल 1 लाख 253 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (BLO) नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची माहिती गोळा करणार आहेत. या मोहिमेदरम्यान राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये दुप्पट झालेली नावे हटवणे, स्थलांतरित मतदारांची माहिती अपडेट करणे आणि मृत व्यक्तींची नावे यादीतून वगळण्याचे काम केले जाईल.

पारदर्शक प्रक्रिया आणि सेल-मॅपिंगचा पर्याय

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आश्वासन दिले आहे की, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असेल आणि कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही. विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये जिथे पुनर्विकास सुरू आहे, तिथल्या नागरिकांनी स्थानिक बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, शहरी भागातील नागरिकांच्या सोयीसाठी आयोगाने ऑनलाईन सेल्फ-मॅपिंगचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे नागरिक घरबसल्या आपली माहिती डिजिटल पद्धतीने अपडेट करू शकतात.

( नक्की वाचा : Devendra Fadnavis: अखेर तारीख ठरली! मुख्यमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची डेडलाईन; बँकांना दिले 'हे' कडक आदेश )

मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक
 

या मोहिमेचा संपूर्ण कार्यक्रम आयोगाने निश्चित केला असून तो पुढीलप्रमाणे असेल:

  •  30 जून ते 29 जुलै 2026: बीएलओ (BLO) अधिकारी घराघरात जाऊन अर्जांचे वाटप आणि संकलन करतील.
  •  5 ऑगस्ट 2026: प्रारूप मतदार याद्यांची (Draft Voter List) प्रसिद्धी केली जाईल.
  •  5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026: या कालावधीत नागरिकांना आपल्या हरकती आणि दावे नोंदवता येतील.
  •  3 ऑक्टोबर 2026: सर्व हरकती आणि दाव्यांचा निपटारा केला जाईल.
  •  7 ऑक्टोबर 2026: महाराष्ट्राची अंतिम आणि शुद्ध मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

ज्या नागरिकांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे, त्यांनी या मोहिमेचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com