Weather Update : मुंबईत बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी असह्य उकाडा आणि उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या. मंगळवारी दिलेल्या पूर्वमानानुसार बुधवारीदेखील मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानुसार बुधवारी नागरिकांना उष्ण व दमट वातावरणाचा अनुभव आला. दरम्यान, बुधवारी पुन्हा राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे झाली. त्यानुसार आजही मुंबई, मुंबई उपनगरासह कोकणात तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात बुधवारी 38.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा 5.7 अंशांनी अधिक होते. तसेच कुलाबा येथे 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.सलग दुसऱ्या दिवशी सांताक्रूझ येथील तापमानाचा पारा 38 अंशापार नोंदवला गेला आहे. बुधवारीदेखील राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे झाली आहे.
नक्की वाचा - Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती पाणीसाठा?
गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात वाढ होत आहे. कोकणात 37 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्यानंतर भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस यल्लो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार तापमानात वाढ झाली होती. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील वाढत्या तापमानामुळे हंगामाच्या सुरुवातीला कडक उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
पुढील 48 तासात तापमानात वाढ
आयएमडीच्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 48 तासांत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 37 आणि 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या काळात आकाश निरभ्र असेल आणि हवामान उष्ण आणि दमट असेल.