Maharashtra ZP Election 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकांचा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात आता राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम
या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होणार असून 21 जानेवारीपर्यंत इच्छुकांना आपले अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल.
एखाद्या उमेदवाराला आपला अर्ज मागे घ्यायचा असेल, तर त्यासाठी 27 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होतील.
( नक्की वाचा : BMC Election 2026 : मतदानाच्या दिवशी बँका सुरु की बंद? खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार का? वाचा सर्व माहिती )
या जिल्ह्यांमध्ये होणार निवडणूक
राज्यातील प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांतही निवडणूक होत आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा या यादीत समावेश आहे. या सर्व ठिकाणी जिल्हा परिषदेसोबतच 125 पंचायत समित्यांसाठीही मतदान होईल.
मतदारांना द्यावी लागणार 2 मतं
या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मतदाराला दोन मतं द्यावी लागणार आहेत. मतदाराला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या बॅलेट पेपरवर किंवा बटणांवर मतदान करावे लागेल. यामध्ये एक मत जिल्हा परिषद विभागाच्या उमेदवारासाठी असेल, तर दुसरे मत पंचायत समिती गणाच्या उमेदवारासाठी द्यावे लागेल. या प्रक्रियेसाठी आयोगाने 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली असून, त्यानुसारच मतदान प्रक्रिया पार पडेल.
( नक्की वाचा : PMC Election : 'घड्याळाचा अलार्म लावा पण ते घरीच ठेवा!' फडणवीसांची टोलेबाजी, पुण्यातील नियोजनाचे काढले वाभाडे )
आरक्षण आणि जागांचे गणित
12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 731 निवडणूक विभाग आहेत. यामध्ये महिलांसाठी 369 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी 83, अनुसूचित जमातीसाठी 25 आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 191 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, 125 पंचायत समित्यांमध्ये एकूण 1462 सदस्य निवडले जाणार आहेत. यात महिलांसाठी 731, अनुसूचित जातीसाठी 166, अनुसूचित जमातीसाठी 38 आणि ओबीसी प्रवर्गासाठी 342 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
जातीचे प्रमाणपत्र आणि अर्जाची पद्धत
यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत ऑफलाईन ठेवण्यात आली आहे. राखीव जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांकडे सध्या हे प्रमाणपत्र नाही, त्यांनी जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची सत्यप्रत किंवा इतर पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. निवडून आल्यानंतर 6 महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र सादर करावे लागेल, अन्यथा संबंधित उमेदवाराची निवड रद्द केली जाईल.
मतदान केंद्रावर विशेष सोयीसुविधा
निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि सर्वसमावेशक मतदानासाठी विशेष पावले उचलली आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर वृद्ध महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आपले मत नोंदवता येईल, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.