PMC Election 2026 : राज्यात होणाऱ्या 29 महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा आज (मंगळवार, 13 जानेवारी) शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्तानं पुण्यात सांगता सभा घेतली. त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात केवळ भाजपचा अजेंडा मांडला नाही, तर अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्या जुन्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. विकासाच्या नावाखाली शहरात नियोजनाचा कसा अभाव होता, याचे उदाहरण देत त्यांनी पुणेकरांसमोर विरोधकांचा समाचार घेतला.
बिंडोक नियोजनाचा फटका
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात आलेला युनिव्हर्सिटी चौकातील पूल पाडण्याची वेळ का आली, यावरून देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका केली.मागच्या काळामध्ये विकासाच्या नावाने अत्यंत बिंडोकपणे कामे करण्यात आली, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
पुढचा कोणताही विचार न करता हा पूल बांधल्यामुळे तो अवघ्या काही वर्षातच पाडावा लागला. हे बिंडोक नियोजन पुण्याला महागात पडले असून, अशा प्रकारे कामाची आखणी करणाऱ्यांना पुण्याचे भविष्य समजलेच नाही, असा टोला त्यांनी लगावला.
( नक्की वाचा : 'तुम्हाला मातोश्री 2.. मुंबईला तिसरं विमानतळ का नाही? 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार )
'घड्याळ घरी ठेवा आणि कमळाचे बटन दाबा'
निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना साद घालताना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरूनही मिश्किल टिप्पणी केली. येत्या 15 तारखेला सकाळी उठण्यासाठी घड्याळाचा अलार्म नक्की लावा, पण तो बंद केल्यानंतर ते घड्याळ घरीच ठेवा आणि मतदान केंद्रावर जा, असे आवाहन त्यांनी केले.
मतदान केंद्रावर गेल्यानंतर उमेदवार कसा दिसतो हे न बघता, केवळ विकासासाठी कमळाचे बटन दाबून भाजपला भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी शिवाजीनगरच्या नागरिकांना केले.
( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )
खिशात नाही आणा....
विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आश्वासनांची खिल्ली उडवताना मुख्यमंत्र्यांनी पुण्याची प्रसिद्ध म्हण वापरली. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी विरोधकांची अवस्था आहे, असे ते म्हणाले. आश्वासन देताना ते पूर्ण कसे करणार याचे भान असावे लागते. भाजप केवळ घोषणा करत नाही, तर मेट्रोचे लोकार्पण आणि 115 कोटी रुपये खर्चून होणारे लहुजी वस्ताद यांचे स्मारक यातून आम्ही कामाची पोचपावती देत आहोत, असे फडणवीस यांनी ठामपणे स्पष्ट केले.
शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत कोणालाही जमला नाही एवढा निधी सिद्धार्थ शिरोळे यांनी या भागासाठी आणला आहे. मुख्यमंत्री म्हणून मी आणि माझे प्रशासन या भागातील 12 ही नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शिवाजीनगरच्या विकासासाठी जितका निधी लागेल, त्यात कधीही कमतरता भासू देणार नाही, अशी खात्री त्यांनी यावेळी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world