सुनील कांबळे, प्रतिनिधी
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सातत्यानं गुणवत्ता यादीवर वर्चस्व गाजवणारं शहर अशी लातूरची ओळख आहे. लातूरमधील शिक्षणाचा खास असा 'लातूर पॅटर्न' असून त्याची राज्यभर नेहमीच उत्सुकता असते. लातूर शहराला राष्ट्रकूट राजाच्या कालखंडापासून इतिहास आहे. शहरातील ग्रामदैवत असलेलं सिद्धेश्वर मंदिर हे त्याची साक्ष आहे. सिद्धेशवर मंदिर आणि लातूरकरांचं खास नातं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात लातूरकर कुठंही असले तरी महाशिवरात्रीच्या काळात त्यांना सिद्धेश्वर मंदिराचे स्मरण होते. या मंदिराचं दर्शन घेण्याची, महाशिवरात्रीपासून सुरु होणाऱ्या जत्रेत सहभागी होण्याची त्यांची इच्छा असते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे मंदिराचा इतिहास?
लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानची निर्मिती 12 व्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या कालखंडात झाली. राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष तिसरा यांनी या मंदिराची स्थापना केली. सातशे वर्षे जुने असणारे हे मंदिर लातूरकरांचे श्रद्धास्थान असून पर्यटकाचं आकर्षण केंद्र आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी भव्य यात्रेचे आयोजन केलं जातं.. महाशिवरात्रीपासून वीस दिवस ही यात्रा चालते.
मराठवाड्यातील धाराशिव ,बीड ,लातूर या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावतात तर दुसरीकडे कर्नाटक आंध्र प्रदेश या सीमावरती भागातील भाविक सुद्धा या यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात.. यावर्षी 72 व्या यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे.
सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचे बांधकाम पुरातन कालीन आहे. मंदिराचे बांधकाम दगडापासून करण्यात आले आहे. या बांधकामात अत्यंत मोहक स्वरुपात कोरीव काम करण्यात आले आहे. त्यामध्ये 52 ओसरींचा समावेश करण्यात आलाय. .मंदिर परिसरात एक पुरातकालीन शिलालेख आजही अस्तिवात आहे.या शिलालेखावर संस्कृत भाषेत लिखाण केलं आहे.हा शिलालेख 700 वर्ष जुने असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात येते.
मंदिराच्या डाव्या बाजूला बारावा आहे. यामध्ये सप्तसुंदरीच्या मूर्ती आहेत. यामधून दक्षिणात्य संस्कृतीचे दर्शन होते. या मंदिराच्या भिंतीवर अनेक कोरीव शिल्प, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, हत्ती, घोडे, देव देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती तीन हत्ती कोरलेले आहेत. हत्ती हे शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
लातूरचे ग्रामदैवत
सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1910 साली आला. या मंदिराबाबत इतिहासामध्ये अनेक पुरावे मिळतात. रत्नापूर महात्म्य या धर्मग्रंथांमध्ये सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचा दाखला दिला आहे. लातूरचे पूर्वीचे नाव रत्नापूर होते. त्यामुळे रत्नेश्वर हे लातूरचं ग्रामदैवत म्हणूनही ओळखले जाते.
गवळी समाजाला पहिला मान
श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या यात्रेची सुरुवात महाशिवरात्रीपासून होते. शिवरात्रीच्या आदल्या रात्री बारा वाजता संपूर्ण गवळी समाज बांधवाकडून सिद्धेश्वराला दुग्धाभिषेक करण्यात येतो. यानंतरच सिद्धेश्वराची पूजा अभिषेक केली जाते. ही प्रथा फार जुनी असून लातूर शहरातील गवळी समाजाला हा मान आहे.