Mukhyamantri Teerth Darshan Yojana Closed: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील अनेक महत्त्वाकांशी योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. माझी शाळा, आनंददायी शाळा, आनंदाचा शिधा यासारख्या अनेक योजना बंद झाल्या आणि महायुतीत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. एकनाथ शिंदेंची कोंडी करण्यासाठीच योजना बंद केल्याचेही आरोप अनेकदा झाले. अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरु केलेली आणखी एक योजना बंद करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.
तीर्थ दर्शन योजना बंद!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चांगलीच गाजली होती. या योजनेला सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला ब्रेक लागला आहे.
अनेक जिल्ह्यात मुख्यमंत्री तीर्थ योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून, ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रेचे स्वप्न भंगले आहे. तर सर्वाधिक प्रतिसाद मिळालेल्या जालना जिल्ह्यात प्राप्त झालेल्या ५ हजार ७२२ अर्जांपैकी केवळ ९२९ अर्जांना मंजुरी मिळाली आहे.तर तब्बल ४ हजार ७९३ अर्ज अद्याप प्रलंबित किंवा छाननीच्या प्रक्रियेत आहेत.
ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, अशा १२३९ लाभार्थ्यांना कधी बोलावले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशीच काही परिस्थिती राज्यातील अनेक जिल्ह्यात आहे. त्यामुळे योजना बंद पडली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.