NCP Merger Exclusive : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'NDTV मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करून पक्ष पुन्हा एकत्र आणण्याची मनापासून इच्छा होती आणि त्या दृष्टीने सर्व तयारी झाली होती, असे जयंत पाटील यांनी या मुलाखतीत सांगितले. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या या निर्णयाला त्यांच्याच गटातील 2 ते 3 बड्या नेत्यांचा विरोध होता, असा गौप्यस्फोट पाटील यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील दुरावा संपवून पक्ष पुन्हा एक करण्यासाठी अजित पवार स्वतः खूप सकारात्मक होते. जयंत पाटील यांच्या दाव्यानुसार, अजित पवार हे विलीनीकरणाच्या प्रस्तावामुळे प्रचंड आनंदी होते. इतकेच नाही तर सुनेत्रा पवार यांनीही या प्रक्रियेला आपला पाठिंबा दर्शवला होता. राष्ट्रवादीचे विलीनीकरण हा केवळ चर्चेचा विषय नव्हता, तर त्याबाबतच्या तारखाही निश्चित झाल्या होत्या. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही प्रक्रिया मध्येच थांबली.
नेमका अडथळा कुठे होता?
जयंत पाटील यांनी मुलाखती दरम्यान सांगितले की, अजित पवार यांनी त्यांना स्वतः 2 ते 3 नेत्यांची नावे सांगितली होती ज्यांचा या विलीनीकरणाला विरोध होता. या नेत्यांना विलीनीकरण झाल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांशी कशा प्रकारे वागतील आणि समन्वय कसा साधला जाईल, याबाबत काही शंका होत्या.
मात्र, अजित पवार यांनी पुढाकार घेऊन हा विरोध मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या बैठका घडवून आणल्या होत्या आणि विरोध करणाऱ्यांची समजूत काढण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती.
( नक्की वाचा : NCP News: शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, विलिनीकरणाची तारीखही ठरलेली; मग अजित पवार गट मागे का हटला? )
12 फेब्रुवारीची तारीख झाली होती निश्चित
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा खुलासा म्हणजे विलीनीकरणाची तारीख. जयंत पाटील यांनी सांगितले की, 16 जानेवारी रोजी त्यांच्या घरी एक महत्त्वाची बैठक झाली होती आणि त्यानंतर 17 जानेवारीला बारामतीत सविस्तर चर्चा झाली.
या चर्चेनंतर सुरुवातीला 8 किंवा 9 फेब्रुवारी ही तारीख विलीनीकरणासाठी सुचवण्यात आली होती, मात्र अखेर 12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. अजित पवार यांना विश्वास होता की, त्यांनी एकदा निर्णय जाहीर केला की पक्षातील 40 पैकी किमान 38 ते 39 आमदार त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत.
( नक्की वाचा : Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडं उपमुख्यमंत्रिपद, पण अजित पवारांचं 'पॉवरफुल' मंत्रालय कापलं )
सुनेत्रा पवार यांच्याकडून आता अपेक्षा
अजित पवार यांची ही अपूर्ण राहिलेली इच्छा आता सुनेत्रा पवार पूर्ण करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जयंत पाटील यांनी आशा व्यक्त केली आहे की, सुनेत्रा पवार योग्य वेळी योग्य निर्णय घेतील आणि विलीनीकरणाचा जो प्रस्ताव आजही खुला आहे, त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलतील. सध्या अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वजण शोकसागरात असताना यावर जास्त भाष्य करणे राजकीयदृष्ट्या योग्य नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रणनीती हेच होते संकेत
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. विलीनीकरण 200 टक्के होणार याची खात्री असल्यामुळेच तो निर्णय घेण्यात आला होता, असे जयंत पाटील म्हणाले. अजित पवार यांनी अनेक जिल्हाध्यक्षांना शक्य तिथे महाविकास आघाडीसोबत जाण्याचे निर्देश दिले होते. हे सर्व संकेत विलीनीकरणाच्या दिशेनेच होते, असा दावाही जयंत पाटील यांनी केला. मात्र आता या प्रक्रियेला भविष्यात काय वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इथे पाहा VIDEO