जाहिरात

NCP News: शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, विलिनीकरणाची तारीखही ठरलेली; मग अजित पवार गट मागे का हटला?

NCP Merger News : 17 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या बैठकीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या विषयाला नवं वळण  मिळालं आहे.

NCP News: शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, विलिनीकरणाची तारीखही ठरलेली; मग अजित पवार गट मागे का हटला?
NCP Merger News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
मुंबई:

NCP Merger News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. शरद पवार गटाकडून या विलिनीकरणासाठी सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे दावे केले जात असले, तरी अजित पवार गटातील नेत्यांनी मात्र या प्रक्रियेला विरोध दर्शवल्याचे स्पष्ट होत आहे. 

17 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या बैठकीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या विषयाला नवं वळण  मिळालं आहे. या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसत असले, तरी अजित पवार गटातील इतर प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जाणारी आहे.

सत्तेतील वाटा आणि राजकीय समीकरणे

अजित पवार गटातील नेत्यांचा विलिनीकरणाला विरोध असण्यामागे मुख्य कारण म्हणजे सध्याची सत्ता समीकरणे असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गट सध्या राज्यात सत्तेत सहभागी आहे आणि महत्त्वाची पदे त्यांच्याकडे आहेत. 

दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाले, तर शरद पवार गटातील नेत्यांचाही सत्तेत वाटा द्यावा लागेल. यामुळे सत्तेत जास्त वाटेकरी निर्माण होतील आणि सध्याच्या मंत्र्यांचे किंवा नेत्यांचे महत्त्व कमी होण्याची भीती अजित पवार गटाला वाटत आहे. सत्तेतील आपले स्थान अबाधित राखण्यासाठी हा गट सध्या विलिनीकरणापासून लांब राहू इच्छितो.

( नक्की वाचा : Sunetra Pawar : पडद्यामागची ताकद आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; वाचा कसा आहे सुनेत्रा पवारांचा प्रवास )
 

नेत्यांमधील मतभेद

शरद पवार गटाचे नेते जसे की जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे हे विलिनीकरणासाठी अत्यंत आग्रही आहेत. मात्र, अजित पवार गटातील सुनील तटकरे, प्रफुल पटेल, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या मनात याबद्दल साशंकता आहे. 

सुनील तटकरे यांनी बारामतीमधील बैठकीचा संदर्भ केवळ चहापानापुरता मर्यादित असल्याचे सांगून विलिनीकरणाचा विषय फेटाळून लावला आहे. छगन भुजबळ यांनी तर या विषयावर वारंवार विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणेच टाळले, ज्यावरून या गटात एकत्रीकरणाबाबत अजिबात उत्साह नसल्याचे दिसून येते.

अजित पवारांची भावनिक साद की राजकीय खेळी

शशिकांत शिंदे यांच्या दाव्यानुसार, अजित पवार हे भावनिक असून त्यांना साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकत्र येण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्या गटातील इतर नेत्यांना ही केवळ राजकीय सोय वाटते आहे. 

विलिनीकरणाची तारीख 12 फेब्रुवारी ठरली होती, असा दावा शरद पवार करत असले तरी, अजित पवार गटाकडून अशा कोणत्याही तारखेचा किंवा निर्णयाचा स्वीकार करण्यात आलेला नाही. उलट, विलिनीकरणाचा मुद्दा आता राजकीय सोयीनुसार समोर आणला जात असल्याचा सूर अजित पवार गटातून उमटत आहे.

विलिनीकरणाचा प्रस्ताव थंड बस्त्यात

सध्याच्या परिस्थितीत शरद पवार गट विलिनीकरणासाठी जेवढा उत्सुक दिसत आहे, तेवढाच अजित पवार गट या विषयाला थंड बस्त्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही गट एकत्र आले तर भविष्यातील निवडणुकांमध्ये जागावाटपाचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो, याची जाणीव अजित पवार गटाला आहे. त्यामुळेच, जोपर्यंत सत्तेतील आपले स्थान सुरक्षित आहे, तोपर्यंत विलिनीकरणाचा कोणताही धोका पत्करण्यास हा गट तयार नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com