विशाल पुजारी, कोल्हापूर
Kolhapur News : इंस्टाग्रामवर व्हिडिओ रील टाकल्यानंतर राग अनावर होण्याच्या अनेक घटना आहेत. मात्र एका पती पत्नीने आपल्यातील राग व्यक्त करण्यासाठी हे सोशल मीडिया माध्यम वापरलं. पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्यानंतर सुरू झालेल्या इन्स्टावरील रील एका खुनानंतर थांबले आहेत. ही घटना घडली आहे कोल्हापुरात. एका महिलेनं पतीच्या केलेल्या निर्घृण खूनामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, लखन बेनाडे या व्यक्तीचा मृतदेह हिरण्यकेशी नदीत आढळून आला. लखन बेनाडे हे काही दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये होती. बेनाडे यांनी यापूर्वी ज्या महिलेविरोधात तक्रार दिलेली त्याचा तपास पोलिसांनी घेतला होता. यामध्ये अपहरण करून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी लक्ष्मी बेनाडे/घस्ते, विशाल घस्ते, आकाश उर्फ माया दिपक घस्ते, संस्कार महादेव सावर्डे, अजित उदय चुडेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या क्रूर हत्येमागे पुरावा नष्ट करण्याचा आरोपींचा हेतू स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितलं. मारेकऱ्यांनी बेनाडे यांचा फक्त जीवच घेतला नाही, तर ओळख पटू नये यासाठी मृतदेहाचे दोन तुकडे केले. हा तुकडे केलेला मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहात फेकून दिला.
काही दिवसांपूर्वी लखन बेनाडे याने लक्ष्मी या महिलेने लग्न झाल्यानंतर मारहाण करून पैसे घेऊन गेल्याची तक्रार पोलिसात दिलेली. या तक्रारीमध्ये ज्या महिलेचे नाव दिलेलं होतं ते लक्ष्मी बेनाडे ही महिला या खून प्रकरणामधील प्रमुख आरोपी आहे. या महिलेची विविध पोलीस ठाण्यात लखन बेनाडे यांनी तक्रार दिलेली. महिलेने तीन लाख रुपये मागितल्याचे देखील तक्रारींमध्ये होतं. या सर्व प्रकारानंतर या महिलेने साथीदारांसोबत मिळून बेनाडे यांच्या अपहरणाचा कट रचला आणि हा खून केला.
इंस्टाग्रामवर रील, पोलिसात तक्रार महागात पडली
लखन बेनाडे याने मृत्यूपूर्वी याबाबत माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी बेनाडे या महिलेचं पूर्वी एक लग्न झालेलं होतं. विशाल घस्ते या नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालेलं. हा व्यक्ती एका गुन्ह्यात जेलमध्ये होता. याच दरम्यानच्या काळात लक्ष्मी या महिलेने लखन बेनाडे या व्यक्तीशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर लक्ष्मी ही लखन याला त्रास देऊ लागली. लक्ष्मीने अनेकदा पैसे उकळण्याचा आरोप लखनने केला. लग्नानंतर काही दिवसांनी घर सोडून गेलेल्या लक्ष्मीने लखनकडे तीन लाख रुपयांची मागणी देखील केलेली. दरम्यानच्या काळात मारहाण देखील केलेली अशी माहिती लखन बेनाडे यांनी माध्यमांसमोर दिलेले. या सर्व प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये आहे. लखनने या तक्रारी दिल्यानंतर इन्स्टाग्रामवर रील देखील करण्यास सुरुवात केली. लखनच्या रील पाठोपाठ लक्ष्मी बेनाडे हीने देखील रील करण्यास सुरुवात केलेली. या रीलमध्ये लक्ष्मी या महिलेने शिवीगाळ केल्याचे देखील आढळून आलं.
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी विशाल गस्ते या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे लखन बेनाडे या मिसिग इसमाबाबत चौकशी केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन त्याचेकडे अधिक कसून चौकशी केली.तेव्हा घस्ते याने सांगितले की, तो गेल्या दोन वर्षापूर्वी राजारामपुरी पोलीस ठाणेच्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्यानंतर जेलमध्ये होता. त्यावेळी त्याची पत्नी लक्ष्मी ही लखन बेनाडे याचेकडे बचत गटाचे कर्ज मागणीसाठी गेली होती. त्यावेळी तिला कर्जाची गरज होती म्हणून लखन बेनाडे याने तिचा गैरफायदा घेऊन तिचेशी शरीर संबंध ठेवले होते. त्याचे व्हिडीओ करुन ते प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला मानसिक व शारीरीक त्रास देत होता. पत्नी लक्ष्मी हिला लखनने घरी ठेऊन घेतले होते. तेव्हापासून ती लखन बेनाडे हिच्या घरी राहत होती. घस्ते जेलमधून बाहेर आल्यानंतर लक्ष्मी ही लखन बेनाडे याच्या घरातून पळून आली. त्यानंतर सद्धा लखन बेनाडे हा विशाल घस्ते व त्याची पत्नी लक्ष्मी हिच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी देऊन मानसिक व शारीरीक त्रास देत होता. या रागातूनच लक्ष्मी आणि विशाल घस्ते यांनी काही साथीदारांसह मिळून लखन बेनाडेचं अपहरण केलं आणि त्याचा खून केला. सध्या या खुनातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.