Jalgaon Crime : आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी केली जात आहे. दरम्यान जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात पूर्ववैमनस्यातून 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करून घरी परतत असताना तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या घटनेनंतर पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. हेमंत संजय सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. दोन महिन्यापूर्वी या तरुणाने काही जणांसोबत वाद झाला होता आणि या वादाचा वचपा काढण्यासाठी हेमंत सोनवणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करून मध्यरात्री घरी जात असताना वाटेत अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयित तरुणाला अटक केली आहे.
नक्की वाचा - Satara Crime : आरोपी तलवारीसह पोलीस ठाण्यात, चौकशीसाठी आलेल्या तरुणाने जीवन संपवलं; हैराण करणारं प्रकरण
आज महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जळगावातील पाचोरा शहरातही महाराजांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हेमंत सोनावणेही महाराजांच्या कार्यक्रमासाठी शहरात गेला होता. जन्मोस्तव साजरा करून मध्यरात्री घरी परतत असताना वाटेतच त्याच्यासोबत घात झाला.