Manmad: युद्धामुळे देशात गॅस टंचाई, पण मनमाडच्या गुरुद्वारामध्ये हजारोंचा स्वयंपाक होतोय बिनधास्त; वाचा कसं?

LPG Shortage Solutions : गॅसच्या वाढत्या टंचाईमुळे देशभरातील अनेक मोठी देवस्थाने आणि तिथली अन्नछत्र सेवा संकटात सापडली आहेत. त्याचवेळी   मनमाडच्या एका गुरुद्वाराने मात्र सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Manmad News : गॅस असो वा नसो, येथील हजारो भाविकांची भूक भागवणारी लंगर सेवा कधीही थांबत नाही
मनमाड, नाशिक:

निलेश वाघ, प्रतिनिधी

LPG Shortage Solutions : पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धाची झळ सध्या संपूर्ण जगाला बसत आहे. या युद्धाचे परिणाम  थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. गॅसच्या वाढत्या टंचाईमुळे देशभरातील अनेक मोठी देवस्थाने आणि तिथली अन्नछत्र सेवा संकटात सापडली आहेत. त्याचवेळी   मनमाडच्या एका गुरुद्वाराने मात्र सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. गॅस असो वा नसो, येथील हजारो भाविकांची भूक भागवणारी लंगर सेवा कधीही थांबत नाही. 15 वर्षांपूर्वी घेतलेल्या एका धाडसी आणि दूरदृष्टीच्या निर्णयामुळे हे शक्य झाले आहे.  

मनमाडचे ऐतिहासिक गुप्तसर साहिब गुरुद्वारा

नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात असलेल्या गुप्तसर साहिब गुरुद्वाराला 100 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शीख धर्माचे गुरु गुरु गोविंद सिंग हे आपल्या अश्वासह या ठिकाणी असलेल्या एका विहिरीत गुप्त झाले होते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या स्थानाला 'गुप्तसर साहिब' असे संबोधले जाते.

Advertisement

महाराष्ट्रात नांदेडच्या गुरुद्वारानंतर या स्थानाला अत्यंत पवित्र मानले जाते. दररोज देशभरातून हजारो शीख भाविक श्रद्धेने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.


( नक्की वाचा : Vasai News : मासे खाताय की विष? वसईतील विक्रेत्याचा अघोरी प्रकार उघड; नागरिकांच्या जिवाशी थेट खेळ, पाहा VIDEO )

संकटाच्या काळातही अखंड लंगर सेवा

या गुरुद्वारात केवळ दर्शनच नाही, तर सेवेचाही मोठा यज्ञ अहोरात्र सुरू असतो. दररोज साधारण 8 ते 10 हजार भाविक या ठिकाणी लंगरचा म्हणजेच महाप्रसादाचा लाभ घेतात. केवळ मंदिरात येणारे भाविकच नाही, तर रेल्वे स्थानकावरील गरजू, बेघर आणि निराधार लोकांसाठीही ही लंगर सेवा वर्षानुवर्षे अविरत सुरू आहे. 

या लंगरमध्ये रोज ताजी भाजी, पोळी, डाळ आणि भात अतिशय श्रद्धेने बनवला जातो. मध्यरात्री 1 वाजल्यापासूनच दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होते, तर दुपारी 2 ते 5 या वेळेत रात्रीच्या जेवणाचे नियोजन केले जाते.

( नक्की वाचा : Iran Israel War : फक्त 2 तासांची नोटीस अन् युद्धाच्या मैदानात भारतीय लेकीची एन्ट्री; वाचा थरकाप उडवणारी गोष्ट )

15 वर्षांपूर्वीची निर्णय काय होता?

एवढ्या मोठ्या प्रमाणात लंगर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधन आणि गॅसची गरज भासते. मात्र, गॅसवर अवलंबून न राहता गुरुद्वाराच्या तत्कालीन व्यवस्थापनाने १५ वर्षांपूर्वीच वाफेवर चालणारी स्वयंपाक यंत्रणा कार्यान्वित केली होती. यामध्ये एका बॉयलरमध्ये थोडी लाकडे जाळून त्यातून वाफ तयार केली जाते. ही वाफ पाइपद्वारे ५ मोठ्या स्टीलच्या भांड्यांपर्यंत पोहोचवली जाते. याच वाफेच्या दाबावर हजारो लोकांसाठीचा स्वयंपाक अत्यंत कमी खर्चात आणि वेळेत तयार होतो. यामुळे गॅस टंचाईचा कोणताही परिणाम या सेवेवर होत नाही.

इंधन टंचाईवर मात करत गुरुद्वारा बनला आत्मनिर्भर

सध्या युद्धाच्या परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचे दरही गगनाला भिडले आहेत. याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिक आणि अनेक देवस्थानांना बसला असून काही ठिकाणची अन्नछत्र सेवा कोलमडली आहे. मात्र, अशा आणीबाणीच्या काळातही मनमाड गुरुद्वाराची लंगर सेवा अखंड सुरू आहे. गॅस टंचाईवर आधीच मात करत या गुरुद्वाराने आत्मनिर्भरतेकडे टाकलेले पाऊल आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article