UAE Rescue Mission: इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडालेला असताना आकाशात फक्त लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांचा थरार पाहायला मिळत आहे. सर्वत्र भीतीचे सावट पसरलेले असून अनेक देश आपल्या नागरिकांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत. अशाच एका अत्यंत कठीण आणि तितक्याच संवेदनशील मोहिमेवर एक 23 वर्षांची तरुण मुलगी निघाली होती. घरून निघताना तिने आपल्या आईला मारलेली हाक काळजाचा ठोका चुकवणारी होती. "आई, मी परत येईन की नाही माहीत नाही, पण मला जावं लागेल," हे तिचे शब्द एका मोठ्या साहसाची नांदी होती.
ही साहसी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून फरिदाबादची लेक दीपिका अधाना आहे. इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग दाटलेले असताना एअर इंडिया एक्सप्रेसच्या या वैमानिकाने जीवावर उदार होऊन एक महत्त्वाची कामगिरी फत्ते केली आहे. युएईमध्ये अडकलेल्या 169 भारतीय प्रवाशांना सुखरूप मायदेशी आणण्याची जबाबदारी दीपिकाने लीलया पेलली. विशेष म्हणजे ही संपूर्ण मोहीम केवळ महिला क्रू मेंबर्सनी हाताळली, ज्यामध्ये कॅप्टन जसविंदर कौर आणि दीपिका अधाना यांच्यासह 4 महिला कर्मचारी होत्या.
आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलचा संपर्क तुटला
दीपिकाला 6 मार्च रोजी सकाळी 10:15 च्या सुमारास अचानक निरोप मिळाला की तिला रॅस अल खैमाह येथे बचाव मोहिमेसाठी जायचे आहे. खरं तर या फ्लाईटसाठी तिच्या मैत्रिणीचे नाव होते, पण अचानक ड्युटी बदलली आणि केवळ 2 तासांत तिला या आव्हानासाठी तयार व्हावे लागले.
( नक्की वाचा : Mumbai to Dubai :समोरून येत होते क्षेपणास्त्र! मुंबई-दुबई विमानाचा हवेतच थरारक यु-टर्न; पाहा काय घडलं? )
युद्धाची परिस्थिती असल्याने मनात धाकधूक होती, पण कर्तव्याची भावना त्याहून मोठी होती. दुपारी 2:00 वाजता विमान तिथे लँड झाले तेव्हा विमानतळावर नेहमीसारखी वर्दळ नव्हती, तर एक सुन्न शांतता पसरली होती.
तिथून 169 भारतीयांना घेऊन दुपारी 3:30 वाजता विमानाने दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले. उड्डाण करत असतानाच एक असा क्षण आला जेव्हा विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच एटीसीशी असलेला संपर्क काही काळासाठी तुटला. नेटवर्क गेल्यामुळे विमानात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र काही वेळातच संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले, तेव्हा प्रवाशांच्या डोळ्यांत आपल्या घरी सुखरूप पोहोचल्याचा आनंद आणि या धाडसी मुलीबद्दल कृतज्ञता होती.
( नक्की वाचा : Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल )
आजोबांचे स्वप्न आणि संघर्षाचा प्रवास
दीपिका ही फरिदाबादच्या तिगाव भागातील रहिवासी आहे. तिचे वडील योगेश अधाना आर्किटेक्ट आहेत तर आई बबली अधाना गृहिणी आहेत. दीपिकाला वैमानिक बनवण्याचे स्वप्न तिचे दिवंगत आजोबा अमृत सिंह अधाना यांनी पाहिले होते. त्यांचेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी दीपिकाने 2020 मध्ये 12 वी पूर्ण केल्यावर वैमानिक होण्याचे प्रशिक्षण सुरू केले. कोरोनाच्या काळात तिने घरातूनच अभ्यास केला आणि 2021 मध्ये व्यावसायिक पायलट लायसन्स मिळवले.
त्यानंतर तिने मध्य प्रदेशातील रेवा येथील फाल्कन एव्हिएशन अकादमीमध्ये 200 तास विमान चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. एअरबस 320 सारखी मोठी विमाने उडवण्यासाठी लागणारे विशेष ट्रेनिंग तिने ग्रीस आणि इस्तंबूलमध्ये घेतले. अखेर सप्टेंबर 2023 मध्ये तिची निवड एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये झाली आणि एप्रिल 2024 पासून ती तिथे कार्यरत आहे. आज तिच्या या धाडसी कामगिरीमुळे केवळ तिचे कुटुंबच नाही, तर संपूर्ण देशाला तिचा अभिमान वाटत आहे. युद्धाच्या छायेतून आपल्या बांधवांना सुखरूप आणणाऱ्या या लेकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world