Manoj Jarange Patil: छगन भुजबळ पुन्हा मंत्री.. मनोज जरांगे संतापले; CM फडणवीस, अजित पवारांना इशारा!

जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे, त्याला मंत्रीपद दिलं जात आहे," अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आज राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार आता छगन भुजबळ सांभाळणार आहेत. एकीकडे छगन भुजबळांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु असतानाच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा इशारा दिला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील?

"छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत. अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत; याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल. जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे, त्याला मंत्रीपद दिलं जात आहे," अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

तसेच "छगन भुजबळ जातीयवादी आहे, त्यांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता. छगन भुजबळांना मंत्रिपद द्या हा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो. मराठा संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांनी प्रवाहात आणलं, त्या माणसाला फडणवीसांनी क्रॉस करून टाकलं, असा घणाघातही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. 

( नक्की वाचा :  Exclusive: काश्मीरला जा, फोटो घे... ISI एजंट आणि हेर यांच्यात काय झाली चर्चा? )

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.  सरकारमध्ये छगन भुजबळ यांना उशिरा का होईना स्थान दिलं त्याबद्दल सरकारचे स्वागत. ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता. पण ओबीसी आरक्षण हा येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा विषय ओबीसी नेत्यांसमोर असणार आहे. ओबीसी प्रश्नावर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी समाजाशी आहे, असा इशाराच हाके यांनी दिला आहे.