सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर:
Manoj Jarange Patil Mumbai Protest: उद्यापासून राज्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरु होणार आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलकांचे वादळ मुंबईत धडकणार आहे. राज्यभरातून लाखो मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीड, पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज रात्रीपासूनच वळवण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले जाणार आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते चारचाकी, दुचाकीच्या ताफ्यातून मुंबईच्या दिशेने कूच करतील.
२७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून शहागड, तुळजापूर, पैठण शेवगाव मार्गे २९ ऑगस्टपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे नियोजन आहे. यात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीडसह शहरातून मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी होतील. या मोर्चा दरम्यान २६ ते २७ ऑगस्ट दरम्यान या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुधवारी मध्यरात्री १२ ते गुरुवारी सकाळी ६ वाजेदरम्यान वाहतूक बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहे.
बीड, पुणे महामार्ग बंद, असा असेल बदल!
१)छत्रपती संभाजीनगर, बिडकीन, पैठण मार्गे शेवगावकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, वाळूज, गंगापूर, नेवासा मार्गे शेवगावकडे जातील व येतील.
२)शहागड, हिरडपुरी, तुळजापूर, नवगाव मार्गे पैठणकडे जाणारी वाहने शहागड, डोणगाव, पाचोड मार्गे पैठणकडे जातील.
३)पैठण, नवगाव, हिरडपुरी मार्गे शहागडकडे जाणारी वाहने पैठण, पाचोड, डोनगाव मार्गे शहागडकडे जातील.