Maratha Reservation: मनोज जरांगे थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने निघणार, मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल

Manoj Jarange Maratha Morcha : मोर्चाची जय्यत तयारी झाली असून, अंतरवाली सराटीत मराठा बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या मोर्चाचा समारोप मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाने होणार होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Manoj Jarange Maratha Morcha: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि 'सगे सोयरे' शब्दाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी लाखो मराठा बांधवांसोबत 27 ते 29 ऑगस्टदरम्यान मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

मोर्चाची जय्यत तयारी झाली असून, अंतरवाली सराटीत मराठा बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या मोर्चाचा समारोप मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाने होणार होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या आंदोलनाला मोठा झटका बसला आहे.

मुंबई हायकोर्टाकडून जरांगेंना झटका

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे कारण देत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने असे मत मांडले की, सरकार मुंबईजवळच्या नवी मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देण्याबाबत विचार करू शकते. न्यायालयाने 'अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नाहीत' अशी महत्त्वाची टिप्पणीही केली आहे.

CM फडणवीसांच्या दूतांनी घेतली भेट

मोर्चा काढण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत जरांगे यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक राजेंद्र साबळे यांनी जरांगेंना भेटून मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती केली. गणेशोत्सवाच्या काळात मोर्चा नको, असे सरकारचे म्हणणे होते. मात्र, जरांगे यांनी ही मागणी धुडकावून लावली. त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की, "आम्ही मोर्चाची आधीच घोषणा केली होती, तेव्हा सरकारने दखल का घेतली नाही?".

Advertisement