Prajakta Mali on Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांनी इव्हेंटबाजीचा परळी पॅटर्न सुरु असल्याचा आरोप केला होता. धस यांनी पत्रकारांशी बोलताना मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. या आरोपांना प्राजक्तानं पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे. या प्रकरणात सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील प्राजक्तानं केली. त्याचबरोबर या प्रकरणाची महिला आयोगाकडं तक्रार केली असल्याचं प्राजक्तानं स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना समज द्यावी अशी मागणी देखील प्राजक्ता माळीनं या पत्रकार परिषदेत केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाली प्राजक्ता?
बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना जी वक्तव्य केली त्याचा निषेध करते, असं प्राजक्तानं सुरुवातीला सांगितलं. गेल्या दीड महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरु आहे. गेली दीड महिने अत्यंत शांततेनं मी याला सामोरी जात आहे. सर्व ट्रोलिंगला, सर्व निगेटीव्ह कमेंट्सना, ही माझी शांतता माझी मूकसंमती नाही. मी, माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सर्वांची ही हातबलता आहे.
एक व्यक्ती आपल्या रागाच्या भरात, उद्वेगाच्या भरात बोलून जाते. त्यावर हजार व्हिडीओ बनतात. मग एका सेलिब्रेटीला त्यावर वक्तव्य करण्यास भाग पडले जाते, मग ती बोलते, मग पहिल्या व्यक्तीला वाटतं ती बोलते. ही चिखलफेक सुरु राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सर्वांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये, समाजमाध्यमासमोर चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही.
( नक्की वाचा : सपना चौधरी, रश्मिका मंदाना आणि प्राजक्ता माळी! सुरेश धस यांनी सांगितला 'आकाचा' परळी पॅटर्न )
एका फोटोवरुन आवई उठावी?
मला असं वाटलं की, हा विषय इतका खोटा आहे. ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे. त्याला काही बेस नाही. एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्विकारताना काढला गेलेला एक फोटो, ही आमची एकमेव भेट, आमचं एकमेव संभाषण त्यावरुन इतकी आवई उठावी? असा सवाल तिने केला.
मला माझ्या चारित्र्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी समोर यावं अशी कधी गरजच वाटली नाही. आज ही वेळ येतीय, अत्यंत नामुश्की आहे. ती वेळ आता आलीय. कारण एक लोकप्रतिनिधी त्यावर टिप्पणी करतात. त्यामुळे मला आज हे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे, असं तिनं सांगितलं.
माझा सुरेश धस साहेबांना एक बेसिक प्रश्न आहे. तुम्ही एक राजकारणी आहात. आम्ही एक कलाकार आहोत. तुमचं जे काय चाललंय ते करत राहा. त्यामध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा यामध्ये काय संबंध आहे. बीडमधील कायदा सुव्यवस्थेवरील प्रश्नांवर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते?
( नक्की वाचा : 'मुख्यमंत्रीसाहेब साप पोसू नका', बीडमधील आक्रोश मोर्च्यात जरांगे पाटील यांचा इशारा )
परळीत पुरुष कलाकार गेला नाही?
ते इव्हेंट मॅनेजमेंटबाबत सांगत होते. पण, यामध्ये महिला कलाकारांचीच नावं का येतात? परळीला कधीच कुणी पुरुष कलाकार कार्यक्रमाला गेला नाही का? त्यांची नावं का येत नाहीत? इव्हेंट मॅनेजमेंटचं तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना...महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं, संघर्षमय आयुष्य जगून महिला मोठ्या होतात, आपलं नाव कमावतात, त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागळतात.
त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमधील महिलांची नावं घेतली. त्यांनी स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली. अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरामध्ये जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. फक्त परळी नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी यापूर्वी ही कामं केली आहेत. यापुढेही करत राहणार. सर्वच कलाकार करतात.
तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीयत तर महिलांच्या कर्तुत्वावर प्रश्न उपस्थित करत आहात. का? कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तुत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टानं आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो यावर तुमचा विश्वास का बसत नाही? असा सवाल करत प्राजक्तानं धस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.