'लाभले आम्हास भाग्य...' मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा

महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या मागणीला मंजुरी दिली आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात येत होती. मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

मायमराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करत या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.

हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.' असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे. 

Advertisement

पाच भाषांना अभिजात दर्जा

मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता अभिजात भाषांची एकूण संख्या 11 वर पोहचली आहे.

यापूर्वी संस्कृत, तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना हा दर्जा मिळाला आहे. सर्वप्रथम तामिळ भाषेला 2004 साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर यापूर्वी ओडिया ही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली शेवटची भाषा आहे. 2014 साली ओडियाला हा दर्जा मिळाला आहे. 

Advertisement