निनाद करमकर, प्रतिनिधी
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येत नसेल तरी किमान त्याला मराठी भाषेबद्दल आस्था आणि अभिमान असावा अशी अपेक्षा असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारनं दिला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी मान्य झाल्यानं महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकालाच आनंद झाला असेल, अशी अनेकांची समजूत होते. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता येत नसेल तरी त्याला समोरचा मराठी बोलला, तर हरकत नसते. मराठीचा आग्रह केला तर तो सर्वजण मान्य करतात, अशी तुमची समजूत असेल तर या समजुतीला तडा देणारी घटना ठाण्याजवळच्या मुंब्रामध्ये घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठीसाठी मागायला लावली माफी
विशाल गवळी या मराठी तरुणाला मराठी बोलण्याचा आग्रह केला म्हणून मुंब्राकरांची दादागिरी सहन करावी लागली. हा तरुण मुंब्रामध्ये फळ विकत घेत असताना हा प्रकार घडला. त्यानंतरच्या वादावादीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडिओनुसार विशालनं फळं विकत घेत असताना समोरच्या व्यक्तीला 'महाराष्ट्रात राहता तर मराठी बोलता येत नाही का?' असं विचारलं. त्यानं हे विचारताच तो फळ विक्रेता संतापला. मुंब्रामधील अन्य नागरिकांनी देखील त्याला साथ दिली. मला मराठी येत नाही, मी हिंदीमध्येच बोलणार असं हा फळविक्रेता बोलल्याचा आरोप आहे. इतर फळ विक्रेते आणि स्थानिक रहिवाशांनी मराठी तरुणाला घेरले.
( नक्की वाचा : IAS Transfer मुख्यमंत्र्यांनी दिले प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश, मुंडे बंधू-भगिनींना दिलासा )
मुंब्र्यात मराठी-हिंदी वाद का करतो? आम्हाला मराठी येत नाही काय करायचे ते कर अशी दादागिरी तिथं जमलेल्या जमावाची विशालवर सुरु होती. 'महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन,' अशी धमकी विशालनं दिली, असा आरोप जमावातील काही जण करत होते. विशालनं मात्र हे सर्व आरोप फेटाळल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.
अखेर वाढत्या जमावापुढे विशालला कान पकडून सर्वांची माफी मागणे भाग पडले. माझ्या बोलण्यानं कुणी दुखावलं असेल तर माफी मागतो, असं विशालनं सांगितलं. पण, या सर्व प्रकरणात विशाल गवळी या मराठी तरुणावरच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.