Marathwada Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात धुवाँधार पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यातील एकूण 49 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra Rain Update)
ज्यात हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 22 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या 9 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात देखील 16 मंडळात अतिवृष्टीची नोंद केली गेली आहे. जालना जिल्ह्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली असून नांदेडच्या सिंदगी मंडळात सर्वाधिक 222 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 मंडळात अतिवृष्टी
गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा थैमान पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील नारेगाव पिसादेवी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. पुराचे पाणी ओसरत असलं तरीही नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालं आहे. जिल्ह्यातील नऊ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर काल झालेल्या जोरदार पावसामुळे सोयगाव तालुक्यातील सोना नदीला पूर आलं आहे. तर जायकवाडी क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे.
नक्की वाचा - Ratnagiri Rain: रत्नागिरीत पावसाचा जोर कायम! जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, खेड-दापोली रस्ता बंद
बीड जिल्ह्यात दोघे वाहून गेले...
बीड जिल्ह्यात देखील जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. कळंब तालुक्यातील सुबराव शंकर लांडगे (वय ६०) हे भोपला शिवारातून घरी परतताना वाहून गेले. त्यांचा रात्रीपर्यंत शोध सुरू होता. तसेच बीड तालुक्यातील राजाभाऊ टिंगरे हे पोतरा येथे पुरात वाहून गेले होते. मात्र त्यांना शोध मोहिमेनंतर सुखरूप वाचवण्यात यश आले.
नांदेड जिल्ह्यात परिस्थिती
नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे अंगावर भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कच्च्या मातीच्या भिंती कमकुवत झाल्या. त्यातून ही घटना घडली. रात्री शेख नासेर आणि त्यांच्या पत्नी शेख हसीना झोपलेले असताना अंगावर भिंत पडली. ज्यात दोन्ही वृद्ध दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच किनवट तालुक्यात मुसळधार पावसाने बोधडीजवळ रिकामी स्कूल बस पुराच्या पाण्यात अडकली होती. तर चालक बेपत्ता झाला होता. सोबतच हिमायतनगर तालुक्यात हदगाव - हिमायतनगर रस्त्यातील अंडरब्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यातुन एकाने थार कार नेण्याचा प्रयत्न केला, पण ब्रीजमध्ये पाणी जास्त असल्याने कार बंद पडली आणि पाण्यात अडकली. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव जवळची ही घटना आहे. हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते. अनेकांच्या घरात देखील पाणी शिरले, शिवाय तालुक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
हिंगोली जिल्ह्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान
हिंगोली जिल्ह्यात काल 16 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता आणि दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील कयाधू नदी त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं. त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तसेच इसापूर धरणाचे 13 दरवाजे एक मीटरने उघडले असून, 43 हजार 207 क्यूसेक्स इतक्या पाण्याचा पैनगंगा नदीपत्रात विसर्ग सुरू आहे.
परभणी जिल्ह्याला रेड अलर्ट
मागील दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर 14 आणि 15 तारखेला झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पिंगळी, लिमला, कातनेश्वर, आणि राव राजुर या चार मंडळात सर्वाधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत. नुकसानीचे पाहणी दौरे सुद्धा लवकरच करण्यात येतील, तर अजुनही रेड अलर्ट जारी असल्याने नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच दक्षता घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
लातूरच्या जळकोट तालुक्यात अनेक गावांचा तुटला संपर्क
लातूर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे तीरू नदीला पूर आला आहे. या पुरामुळे जळकोट तालुक्यात अनेक गावांचा सपर्क तुटल्याचे चित्र पहायला मिळाले. जळकोट तालुक्यातील अतनुरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने शिवाजी नगर तांडा , मेवापूर , चिंचोली, अतनुर , गव्हान , रावनकोळा , गुत्ती या गावात जाणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. 4 ते 5 तास या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहने अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान पूरपरिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असल्याचे जळकोट तहसीलदारांकडून सांगण्यात आले. तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी तलाठी मंडळ अधिकाऱ्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा
जायकवाडी : 93.65 टक्के
निम्न दुधना : 66.96 टक्के
येलदरी : 95.45 टक्के
सिद्धेश्वर : 99.63 टक्के
माजलगाव : 41.92 टक्के
मांजरा : 92.96 टक्के
पैनगंगा (ईसापूर) : 99.80 टक्के
मनार : 83.71 टक्के
निम्न तेरणा : 93.89 टक्के
विष्णुपुरी : 68.35 टक्के
सीना कोळेगांव : 83.02
धाराशिव तीन दिवस पावसाचं धुमशान
तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर धाराशिव जिल्ह्यात कालपासून पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र या तीन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे नदी-ओढ्यांना आलेल्या पुलात अनेक जनावरे, नागरिक अडकले होते. त्यांना पुरातून बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पशुधन देखील गमावलं आहे. याची काल राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले असून लवकरच नुकसान भरपाई मिळेल असा आश्वासन देखील त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पावसाने मात्र चांगली उघडीप दिली आहे.