डोंबिवलीत पुन्हा स्फोट, MIDCतील कारखान्यात भीषण अग्नितांडव

Dombivli MIDC Blast News : डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
D

Dombivali MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरत आहेत. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या स्फोटानंतर बाजूलाच असलेल्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. दरम्यान आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागलीय, याची माहिती समोर आलेली नाही.

23 मे 2023 : अमुदान कंपनीमध्ये भीषण स्फोट

यापूर्वी 23 मे रोजी डोंबिवली MIDC फेज-2मधील अमुदान कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला होता. दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी हा स्फोट झाला होता. हा स्फोट इतका भीषण होता की परिसरातील इमारतींच्या काचा देखील फुटल्या. वाहनांचं देखील मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू तर 55 जण जखमी झाले होते.

अमुदान कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत कंपनीचा मालक मलय मेहताला अटक केली. ठाणे स्पेशल टास्क फोर्स आणि ठाणे खंडणी पथकाचे एसीपी शेखर बागडे यांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तसंच मलय मेहताची आई मालती मेहताला देखील नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं होतं.

Advertisement

दरम्यान  2016 साली देखील डोंबिवलीतील कंपन्यात अशाच पद्धतीचा भीषण स्फोट झाला होता. या घटनेतही मोठी जीवितहानी झाली होती.  त्यामुळे या कंपन्या डोंबिवलीतून स्थलांतरित कराव्यात अशी मागणी यापूर्वी देखील करण्यात आली होती. 

29 मे 2024 : चायनिज दुकानात सिलिंडरचा स्फोट

29 मे रोजी डोंबिवलीतील टंडन रोडवरी एका चायनिजच्या दुकानातही सिलिंडरचा स्फोट झाला होता. सर्वप्रथम दुकानाला आग लागली आणि त्यानंतर दुकानातील घरगुती सिलिंडरचे ब्लास्ट झाले होते, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली होती. या घटनेत 9 जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. 

Advertisement

दरम्यान हे दुकान नेमके कोणाचे होते? याची कोणतीही माहिती अग्निशमन विभागाकडे नाही. या दुकानाचे मालक देखील घटना घडली त्यावेळी उपस्थित नव्हते. मात्र हे दुकान अधिकृत की अनधिकृत असा प्रश्न डोंबिवलीकरांनी उपस्थित केला होता.