Akola News: अकोल्यात औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक; 8 ते 10 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल

Akola Crime News : हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे पो.ह.वा. आशिष अशोक सुगंधी यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Akola News: अकोला शहरातील बियानी चौक परिसरात 9 सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या एका वादग्रस्त प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मिरवणुकीतील एक व्हिडिओ 12 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये 8 ते 10 अनोळखी इसमांनी औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करताना दिसून येत आहेत.

व्हायरल व्हिडीओच्या तपासणीनंतर गुन्हा दाखल

दरम्यान, सदर प्रकारामुळे जिल्हाधिकारी यांच्याद्वारे दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झाले असून, हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे पो.ह.वा. आशिष अशोक सुगंधी यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे शहरातील शांतता व धार्मिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही घटना 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता बियानी चौकातील नटराज व कन्हैया ड्रेसेससमोर घडली होती. या तक्रारीवरून अज्ञात आठ ते दहा इसमांविरोधात गुन्हा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला रजि. नं. 258/25, भारतीय दंड संहिता 196 व BNS च्या कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले करत असून, दाखला अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल सोपान डाबेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी सदर व्हिडीओ व पुरावे तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. शहरातील शांतता कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement