नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यावरील गंभीर आरोपांनी खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांनी रस्ते, टोलनाके थोपवत मोठा भ्रष्टाचार केला, ते टोल आणि रस्त्याच्या कामातून पैसे खात आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला. या गंभीर आरोपांनी राजकारण तापले असतानाच आता गडकरी यांनी टिकाकारांना उत्तर दिले आहे. आपल्याविरुद्ध मोहीम सुरू असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे एका उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नितीन गडकरींनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत महत्त्वाचे विधान केले. इथेनॉलचा शेतकऱ्यांना फायदा मिळाला,प्रदूषण कमी झाले. इंधन तेलाच्या आयातीवर 22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते, ते जायचे बंद झाले. यामुळे ज्या लोकांचा धंदा मारला गेला ते माझ्यावर नाराज झाले आणि माझ्याविरुद्ध पेड न्यूज सुरू केल्या, असं ते म्हणाले.
सामाजिक, राजकीय आंदोलनाच्या 77 खटल्यांना दिलासा
गडकरी म्हणाले.."राजकारण हा ईर्ष्या, मत्सर,द्वेष आणि अहंकाराचा खेळ आहे. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या अपेक्षेत लोक टीका करत असतात. मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडून एक रुपया घेतला नाही, म्हणून मला कॉन्ट्रॅक्टर घाबरतात. मी खोटी कामे केली नाही,त्यामुळे कोणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होणार नाही, तुम्हीही होऊ नका, असं आवाहनही त्यांनी केले.