Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराडला सध्या खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र वाल्मिक कराड आणि पोलिसांचे हितसंबंध असून बीड पोलीस दलातही वाल्मिक कराडचे चाहते आहेत, त्यामुळे त्याला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होत आहे. यावरुनच आता जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात मोठा दावा केला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत नवनवे खुलासे होत असून त्याचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. याचसंदर्भात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा आरोप केला असून बीडच्या कारागृहातही वाल्मिक कराडने त्याची गँग तयार केल्याचा दावा केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड?
'हाॅस्पिटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे - मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते 'आपोआप' वाल्मिक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते,' असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
तसेच 'एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत. अर्थात, तो वाल्मिक कराड आहे. वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा, थोडी तरी लाज बाळगा... ' असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.