योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Sangram Jagtap criminal case : अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम अरुण जगताप यांच्याविरोधातील कथित धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि सामाजिक तणाव निर्माण करण्याच्या गंभीर आरोपांमुळे त्यांच्यावर थेट फौजदारी खटला दाखल झाला आहे. या खटल्याची आज, (शुक्रवार 21 नोव्हेंबर, 2025) रोजी अकोला येथील न्यायालयात झालेली महत्त्वाची सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख 12 डिसेंबर निश्चित केली आहे. एका लोकप्रतिनिधीविरोधात दाखल झालेल्या या गंभीर प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण?
हा संपूर्ण प्रकार 10 ऑक्टोबर 2025 रोजी सोलापूरमध्ये झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चाच्या सभेतील आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी एका विशिष्ट धर्मीय समाजाच्या भावनांना ठेस पोहोचवणारे आणि समाजामध्ये सांप्रदायिक तणाव निर्माण करणारे बेजबाबदार विधान केल्याचा आरोप आहे.या वक्तव्यामुळे समाजातील एका मोठ्या घटकाच्या भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारदार जावेद जकरिया यांनी म्हटले आहे.
जकरिया हे अकोल्यातील प्रसिद्ध समाजसेवक आणि कच्छी मेमन बिरादरीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, या वक्तव्यामुळे अकोला शहर आणि जिल्ह्यातही याचे गंभीर परिणाम दिसून आले. त्यांनी याप्रकरणी पोलीस प्रशासन आणि विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले.
( नक्की वाचा : Buldhana News : झिंगत आले अन् शाळेत धिंगाणा केला! मुख्याध्यापकाचा विद्यार्थ्यांसमोर Live ड्रामा )
पोलीसांकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने, तक्रारदार जावेद जकरिया यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला. त्यांनी वरिष्ठ फौजदारी अधिवक्ता अधि. नजीब शेख यांच्या माध्यमातून थेट अकोला मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांनी प्रकरणाची दखल घेत ते फौजदारी MCA म्हणून नोंदवून पुढील सुनावणीसाठी योग्य न्यायालयाकडे पाठवले आहे. जकरिया यांनी आपल्या अर्जामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्यावर नुकत्याच लागू झालेल्या भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत अत्यंत गंभीर कलमे लावून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुनावणी पूर्ण, आता 12 डिसेंबरकडे लक्ष
या खटल्याची महत्त्वाची सुनावणी अकोला मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयातील माननीय न्यायाधीश श्री. एन. ए. शर्मा यांच्यासमोर पार पडली. या सुनावणीदरम्यान तक्रारदार जावेद जकरिया यांचा विधानाचा दाखला (Statement) अधिकृतरीत्या नोंदवण्यात आला आणि त्याचे व्हेरिफिकेशन करण्यात आले.खटल्याच्या पुढील प्रक्रियेसाठी हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने प्रकरण आता निर्णायक वळणावर आले आहे. न्यायालयाने आता पुढील सुनावणीची तारीख 12 डिसेंबर निश्चित केली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या हा विषय चर्चेचा ठरला असून, पुढील सुनावणीमध्ये काय निर्णय लागतो आणि त्याचा राजकीय वातावरणावर कसा परिणाम होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.