अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana News : ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याची आणि त्यांना निर्व्यसनी राहण्याचे धडे देण्याची जबाबदारी असते, त्याच शाळेचे मुख्याध्यापक चक्क मद्यधुंद अवस्थेत शाळेच्या आवारात धिंगाणा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे. मेहकर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील या लाजिरवाण्या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रार्थना सुरू असताना विद्यार्थ्यांसमोर घडला प्रकार
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत ही शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत शाळेत आले आणि त्यांनी आवारात धिंगाणा घालायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार घडत असताना शाळेत प्रार्थना सुरू होती आणि सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक हजर होते. दारूच्या नशेत मुख्याध्यापकांचे हे वागणे पाहून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले.
( नक्की वाचा : D-Mart News : डी-मार्टचा कर्मचारीच निघाला 'चोर'; बारकोड स्कॅन होताच किंमत व्हायची कमी, काय आहे घोटाळा? )
व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी
मुख्याध्यापकाच्या या कृत्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला आहे. मुलांसाठी आदर्श असणाऱ्या व्यक्तीनेच असे वर्तन केल्यामुळे, मुख्याध्यापक कांबळे यांच्यावर शिक्षण विभागाने तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अशा प्रवृत्तीला धडा शिकवणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या तसेच अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचाराच्या घटना ताज्या असताना, ही घटना अधिकच गंभीर आहे. आपण ज्या शिक्षकांच्या विश्वासावर आपल्या मुलांना दररोज शाळेत पाठवतो, त्यांचे भविष्य आणि आयुष्य शाळेत खरंच सुरक्षित आहे का? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या आणि त्यांच्यावर चुकीचे संस्कार करणाऱ्या अशा मानसिकतेला आणि वृत्तीला कठोर शासन होणे गरजेचे आहे.
( नक्की वाचा : Trending News : एका महिलेनं केली 4 लग्न, 2 पोलीस अधिकारी, दोन बँक मॅनेजरला ओढलं जाळ्यात, कसा झाला पर्दाफाश? )
शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे
बुलडाणा जिल्ह्यात शालेय व्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या घटना एकापाठोपाठ समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील आदिवासी उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी कागदावर दिल्या जात असल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच, मुख्याध्यापक चक्क दारूच्या नशेत शाळेत येतो, हे अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागासोबत राज्य शिक्षण मंडळ या गंभीर प्रकरणांवर नेमकी काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world