Raj Thackeray: 'अशोक खरात नीच माणूस, राजकारण्यांचा आशीर्वाद.. 'राज ठाकरेंचं CM फडणवीसांना मोठं आवाहन

महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो," असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Raj Thackeray On Nashik Ashok Kharat Case:  नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात याच्या क्रुर कथांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने या कॅप्टन अशोक खरातने शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचे अश्लील व्हिडिओ समोर आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणात बडे राजकीय नेत्यांचे कनेक्शनही समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या संपूर्ण खरात प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. 

काय म्हणालेत राज ठाकरे? 

"अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो," असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

Ashok Kharat : अशोक खरातचा धक्कादायक प्रताप, आजोळही सोडलं नाही; नाशिकच्या 2 तक्रारींनी प्रकरण पेटणार

ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.   महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे, असही मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. 

Advertisement

राजकारण्यांवर टीका..

हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे, अशी खंतही मनसे अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. 

Satara News: मोठी बातमी! सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश; झेडपी निवडणुकीचा राडा भोवला

दरम्यान, मुळात आज महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होत आहे. ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे. ड्रग्स राजरोस विकली जात आहेत. स्त्रियांच्या शोषणाच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा. तेंव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलंत तर आणि तरच तुमच्या भाषणांत तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.