मुंबई: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.. असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर आता याविरोधात मनसेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर GRची होळी..
शिक्षण विभागाने पहिलीपासून हिंदीच्या सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. याबाबत राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरच शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा जीआर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून फाडला गेला. इतकेच नव्हे तर ज्या शिवाजीपार्क परिसरात बॅनर लावले आहे त्या ठिकाणी हा जीआर जाळण्यात देखील आला.
नवी मुंबई, पुण्यात मनसेचे आंदोलन..
राज्य शासनाने इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा सक्तीची केली असून, याविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तसेच पुण्यातील बालगंधर्व चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करत, संबंधित शासकीय आदेशाची (जीआर) होळी केली.
(नक्की वाचा- नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)
दरम्यान, राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये या जीआरसंदर्भात चर्चा झाली. याबाबत मनसेची भूमिका ठाम आहे. पुढे कसं जायचं त्यासंदर्भात राज ठाकरे यांनी सूचना आणि मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरुन टोकाचा संघर्ष होणार हे नक्की.. असा इशाराही मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
(नक्की वाचा- Traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा)