मुंबई: मराठी भाषेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. या वादात आता ठाकरे गटानेही उडी घेतली असून परप्रांतीयांसाठी मराठी शाळा भरवणार असल्याचे बॅनर काही दिवसांपूर्वी झळकले होते. यावरुनच आता मनसेने ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठी भाषेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. एकीकडे मनसेने मराठीसाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असतानाच शिवसेनेकडून मराठीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले होते.
शिवसेना ठाकरे गटाच्या या भूमिकेवर आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली आहे. 'आज उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणारी उबाठा 25वर्ष महापालिकेत सत्तेत होती तेव्हामराठीपेक्षा हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या का वाढली आणि तेव्हांच हिंदीआणि उर्दू शाळेमध्ये मराठी अनिवार्य का केली नाही ?उबाठा ही भैय्यांची ढ टीम आहे याच उत्तर पेंग्विन आणि ढ टीमने द्यावं,' असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका उत्तर भारतीय नेत्याने मनसेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. संसदेत केलेल्या या मागणीनंतर मनसेने बॅनर झळकावत महाराष्ट्रातील खासदारांवर जोरदार टीका केली होती. एक भय्या खासदार बोलत होता आणि तुम्ही मराठी खासदार तोंडात लाचारीचा बोळा घेऊन गुलामांसारखे शांत ऐकून घेत बसला होतात, धिक्कार असो तुमचा, अशी टीका मनसेने केली होती.