राज्यातील अनेक भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे तर सकाळपासूनच पाण्याखाली गेलं. पुण्यासह मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, सातारा, कोल्हापूरसह अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. राज्यात उद्या देखील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुठे-कुठे शाळांना सुट्टी जाहीर?
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 26 जुलै रोजी या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
(नक्की वाचा - अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात साचलं पाणी, भगवान महादेवाला जलाभिषेक)
त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
(नक्की वाचा - जुलै महिन्यात 1500 मिलीमीटर पावसाची नोंद, नवा रेकॉर्ड होण्याची दाट शक्यता)
कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट?
उद्या 26 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, सातारा, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.