
लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
Chemical elements in drinking water : तुम्ही विषारी पाणी तर पित नाही ना? अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जालन्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाणी घातक बनत चाललं आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे अक्षरश: जमिनीतील पाणी विष बनत चालल्याचं दिसून येत आहे. जालन्यातील भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यातून पाण्यात 45 टक्क्यांपेक्षा जास्त 'नायट्रेट' आढळून आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या पाच महिन्यात तपासण्यात आलेल्या एक हजार पाण्याच्या नमुन्यात 402 नमुने दूषित असल्याचं आढळून आलं आहे. 218 पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचं प्रमाण हे 45 पेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. तर 108 नमुन्यात कोलिफॉर्म बॅक्टेरिया, 4 नमुन्यात ई.कोलाय बॅक्टेरिया आणि 39 नमुन्यात मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियमसारखे घटक आढळून आल्याने पिण्याचे पाणी दूषित असल्याचं आढळून आलं आहे. तर पाण्यात मोठ्या प्रमाणात शरीराला घातक असलेले रासायनिक घटक आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे प्रशासनाला एवढा सगळा प्रकार उघडकीस येऊनही काहीच सोयर सुतक नसल्याचा अनुभव अनेक गावातील ग्रामस्थांना येत आहे.
प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने तपासण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे असेच पाण्याचे नमुने जालना शहराच्या भूजल सर्व्हेक्षण विभागच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत.
तपासण्यात आलेल्या नमुन्यात रासायनिक घटकाबरोबर घातक बॅक्टेरिया असल्याचं ही आढळून आलं आहे, भूजल सर्व्हेक्षण विभागातील रसायन शास्त्र तज्ज्ञ राजेश्री भाटूळे यांनी याबाबत माहिती दिली. अनेक गावातील पिण्याचं पाणी ही दूषित असल्याचं आढळून आलं. त्यामुळे स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचा कारभार किती भोंगळ आहे हे स्पष्ट झालंय.
आढळून आलेल्या रासायनिक घटकांत मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम असे घटक आढळून आले आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण धोकादायक पातळीवर तर काही पाण्याच्या नमुन्यात ई.कोलाय, कोलिफॉर्म बॅक्टेरिया ही आढळून आलं आहे. त्यामुळे पाणी प्यायल्यानंतर या घटकांचा शरीरावर दुष्परिणाम होतो. आजार वाढीस लागतात. शरीरातील या घटकांचं प्रमाण वाढल्यास मृत्यू देखील ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटकांमुळे नपुंसकता ही येण्याची जास्त शक्यता असते. पण एवढं सगळं होऊनही प्रशासन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभाग कुंभकर्नासारखी गाढ झोप काढत असल्याचा आरोप होत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं या तपासणीतून समोर आलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी देणाऱ्या पेयजल, जलजीवन मिशन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनेवर ही प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावात लावण्यात आलेलं पाणी फिल्टर प्लँट ही अनेक दिवसापासून बंद असल्याने प्रशासनच्या योजना या फक्त लाल फिती पुरत्याच का? असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचं पाणी उकळुन प्यावं. वेळेप्रसंगी स्वच्छतेसाठी औषधांचा वापर करावा असं आवाहन तज्ज्ञ जाणकारांनी केला आहे.
एकंदरीत जिल्ह्यात शेतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांतील औषधांचे घटक पाण्याच्या नमुन्यात आढळून आल्याने पाण्याचं विष बनतंय का? असा प्रश्न या पाण्याच्या नमुन्याच्या तपासणीतून सामोरं आला आहे. त्यामुळे शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांबरोबर इतर रासायनिक घटकांच्या वापरावर प्रमाण ठरवणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाण्यात वाढणाऱ्या या रासायनिक घटकामुळे व वाढत्या बॅक्टेरियामुळे शरीराला लागणार पाणीचं बिष बनतंय असं म्हणायची वेळ आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world