निलेश बंगाले, वर्धा
परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर मोठा हिंसाचार भडकला होता. अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केले होते. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाला होता. मात्र तरुणाचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.
राहुल गांधी यांना सोमवारी परभणी येथे सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी म्हटलं की, "पोस्टमार्टम रिपोर्ट, व्हिडिओ, फोटोंवरुन 100 टक्के सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कोठडीत झाल्याचे दिसून येते. राहुल गांधी यांच्या आरोपाला गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रत्युत्तर दिलं. ही पोलीस कोठडीतील हत्या नाहीच, असा दावा पंकज भोयर यांनी केला आहे.
वर्ध्यामध्ये माध्यमांशी बोलताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, "विरोधक हे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात अशा काही संघटना आहे ज्यांना महाराष्ट्र स्थिर नको आहे. इथे काही घडत राहिलं पाहिजे. अशा पद्धतीचे प्रयत्न त्यांच्यामार्फत सुरु असतात. परंतु महाराष्ट्रातली जनता समजदार असून अशा खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही."