योगेश शिरसाट, अकोला
मशिदींवरील भोंग्याच्या मुद्यावर काही दिवसांपूर्वी राज्यात मोठं वादंग उठलं होतं. मशिदीवरील भोंग्यावरुन राजकारण देखील तापलं होतं. दोन समुदाय देखील याच मुद्द्यावरुन आमने-सामने आले होते. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी अकोल्यातील एका ट्रस्टने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मशिदीचा भोंगा लाऊडस्पीकरवर वाजण्याऐवजी आता मोबाईलवर वाजणार आहे.
अकोल्याच्या 135 वर्ष जुनी असलेल्या 'कच्छी मशिद ट्रस्ट'च्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत 'कच्छी मशिद ही "अजान ॲप" लाँच करणारी विदर्भातील पहिली मशिद ठरली आहे. या अँड्रॉइड ॲपद्वारे देश-विदेशातील मुस्लीम बांधव थेट अजान ऐकू शकतात.
आता मुस्लिम समाजातील प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा मशिदीवरील अजानच्या भोंग्यांचा आवाज गुंजणार आहे. या दरम्यान, अकोल्यात रविवारी शासकीय विश्रामगृहात आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते "अजान ॲप"चे लोकार्पण करण्यात आले.
पर्यावरणपूरक सौरऊर्जा वापर, ध्वनी मर्यादेचे पालन आणि डिजिटल सुविधा यांचा समन्वय साधणारी ही मशिद देशभरातील मशिदींना प्रेरणा देणारी ठरत आहे. दिवसभरात पाच वेळा होणारी नमाज आणि अजान या ॲपच्या माध्यमातून मुस्लीम बांधवांना सहज माहिती मिळणार आहे.