जाहिरात

ST Ticket Hike: ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत एसटीची दरवाढ; कोणता प्रवास महागला आणि कुणाला सवलत? वाचा सविस्तर

ST Ticket Hike: उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने गावाला जाण्याचे बेत आखणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे.

ST Ticket Hike: ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत एसटीची दरवाढ; कोणता प्रवास महागला आणि कुणाला सवलत? वाचा सविस्तर
ST Ticket Hike: उन्हाळ्यांच्या सूट्टीपुर्वी एसटीनं दरवाढ केली आहे.
मुंबई:

ST Ticket Hike: उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने गावाला जाण्याचे बेत आखणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीने आपल्या तिकीट दरात हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांतच ही दरवाढ लागू होणार असल्याने ऐन सुट्ट्यांच्या हंगामात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. प्रवाशांना आता आपल्या प्रवासासाठी नेहमीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

किती रुपये जास्त मोजावे लागणार?

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा तिकीट दरामध्ये 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला ही वाढ 10 ते 15 टक्के असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र अखेर 10 टक्के दरवाढ निश्चित करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की, प्रवाशांना आता प्रत्येक 100 रुपयांच्या तिकिटामागे अतिरिक्त 10 रुपये द्यावे लागतील. सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता, महामंडळाच्या महसुलात वाढ करण्यासाठी हा निर्णय दरवर्षी घेतला जातो.

( नक्की वाचा : Nashik News : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाजची सक्ती आणि बीफ खाण्याचा दबाव )

दरवाढीचा कालावधी आणि अंमलबजावणी

ही नवीन दरवाढ येत्या 15 एप्रिलपासून लागू होणार असून ती 15 जून पर्यंत कायम राहणार आहे. दोन महिन्यांच्या या कालावधीत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक शहरांकडून गावाकडे प्रवास करतात. 

या काळात एसटीने केलेल्या दरवाढीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकही आपले दर वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना एकूणच प्रवासासाठी खिशाला अधिकचा भार सहन करावा लागणार आहे.

कोणत्या बससाठी दरवाढ लागू ?

एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे की, ही 10 टक्के दरवाढ केवळ साध्या (लाल परी) आणि जलद बससाठीच लागू असणार आहे. विशेष म्हणजे, आरामदायी प्रवास देणाऱ्या शिवनेरी, शिवशाही, शिवाई, हिरकणी आणि शयनयान (स्लीपर) बसच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या बसचे दर पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. ही हंगामी दरवाढ प्रामुख्याने ग्रामीण भागाला जोडणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या पसंतीच्या बसेसना लागू करण्यात आली आहे.

मिळणाऱ्या सवलतींचे काय?

एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलती, जसे की महिलांसाठी असलेली 50 टक्के सवलत आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मिळणारी मोफत प्रवासाची सवलत या दरवाढीनंतरही कायम राहतील. वाढीव दराच्या तिकिटावर या सवलतींची गणना केली जाईल. 15 जूननंतर पुन्हा एकदा एसटीचे तिकीट दर पूर्वीसारखे होतील, असेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com