Mumbai News: आयुष्यभर मुंबईकरांची सेवा, हात जोडून हृदयस्पर्शी निरोप! BEST कर्मचाऱ्याचा भावुक VIDEO

तुंबलेले रस्ते आणि अवघड ट्रॅफिकमधून बेस्टची लाल वा पांढरी-लाल बस सुरक्षितपणे हाकणारे राजेंद्र पोळ निवृत्तीच्या दिवशी भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai BEST Employee Emotional VIDEO:  लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाईन असं म्हटलं जाते. पण लाखो मुंबईकरांना लोकलपर्यंत पोहोचवणारी, जेव्हा लाईफलाईन थांबते तेव्हा मुंबईकरांसाठी रात्रंदिवस धावणारी जीवनवाहिनी म्हणजे बेस्ट बस. ऊन, पावसाचा विचार न करता मुंबईकरांच्या सुखकर, सुरक्षित प्रवासासाठी बेस्टचे कर्मचारी धडपडत असतात. 'मुंबईकर आणि बेस्टची बस' हे या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा भागच होऊन जातात याचीच प्रचिती देणारा एका  बेस्ट कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

Success Story: IAS, IRS, IPS... 3 मित्रांची 'क्लास वन' दोस्ती; एकत्र अभ्यास अन् UPSC पास; प्रेरणादायी कहाणी!

आयुष्यभर मुंबईकरांची सेवा, हृदयस्पर्शी निरोप

 मुंबई बेस्टमधील विक्रोळी आगारामध्ये बसचालक म्हणून काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याचा निवृत्ती समारंभाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक वर्षे मुंबईच्या  वारे, पावसामुळे तुंबलेले रस्ते आणि अवघड ट्रॅफिकमधून बेस्टची लाल वा पांढरी-लाल बस सुरक्षितपणे हाकणारे राजेंद्र पोळ निवृत्तीच्या दिवशी भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. 

ज्या स्टिअरिंगवर हात ठेवून त्यांनी आपल्या संसाराचा आणि अख्या मुंबईकरांच्या प्रवासाचा गाडा हाकलला, त्या बसपासून वेगळे होताना भावनिक झाले. त्यांनी आयुष्यभर सेवा केलेल्या आपल्या लाडक्या बसला प्रदक्षिणा घालत, अत्यंत विनम्रतेने हात जोडले अन् मिठी मारली. त्यांनी आपल्यासोबत असलेल्या वाहक मित्राचीही गळाभेट घेत भावस्पर्शी निरोप दिला.  हा काळजाला भिडणारा निरोप पाहून त्यांच्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले. 

Advertisement

34 वर्ष सेवा, 20 पारितोषिके..

राजेंद्र पोळ हे 1991 मध्ये बेस्ट बसचालक म्हणून विक्रोळी आगारात रुजु झाले. त्यांनी  34 वर्ष 9 महिने बेस्टच्या माध्यमातून मुंबईकरांची सेवा केली. आपल्या नोकरीच्या काळात त्यांनी विनाअपघात प्रामणिकपणे बेस्ट चालक म्हणून काम पाहिले. याचाच सन्मान म्हणून त्यांना 20 पारितोषिके देण्यात आली. आपली बेस्टमधील सेवा सांभाळत त्यांनी संसाराचाही गाडा हाकला. 

विक्रोळी आगारात पार पडला निरोप समारंभ

राजेंद्र पोळ यांच्यासोबतच ज्येष्ठ बस निरीक्षक महादेव बंडगर, वसंत पादीर, अरुण चौघुले यांचाही निरोप समारंभ विक्रोळी आगार कर्मचारी अन् सत्कार कमिटीच्या माध्यमातून पार पडला. निवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्निक सत्कार अन् बेस्टची प्रतिकृती असलेली खास बस यावेळी गिफ्ट म्हणून देण्यात आली. यावेळी कमिटीचे अध्यक्ष संतोष सुर्यवंशी, सेक्रेटरी प्रताप शिर्के महेश पानसरे, यांच्यासह निवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते. 

कार्यक्रमाकडे अधिकाऱ्यांची पाठ, कर्मचाऱ्यांचा संताप

दरम्यान, बेस्टमधून जेष्ठ चालक, वाहक निवृत्त होत असताना या निरोप समारंभात एकही अधिकारी उपस्थित नसल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. आयुष्याची उमेदीची आणि तारुण्यातील वर्ष बेस्टच्या सेवेत घालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ नाही का? बेस्टला कोणी वाली आहे की नाही? असे सवाल यावेळी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केले. 

Advertisement

Pandharpur News: तुम्हीही करा पंढरीच्या विठ्ठल- रखुमाईची सेवा! पुजेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु; कसं कराल बुकिंग?