मुंबई: मुंबईमध्ये सध्या गणपती उत्सवाची जोरदार धामधुम सुरु आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. लालबागच्या राजाच्या मंडळाकडून भाविकांच्या सेवेसाठी यंदा महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले होते. मात्र या महाप्रसाद वाटपाला मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, लालबागचा राजा मंडळाने यावर्षीपासून गणेशोत्सव काळात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद स्वरुपात जेवण देण्याचे ठरवले होते. परंतु मुंबई महापालिकेने या अन्नछत्रासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदा हा महाप्रसादाचा उपक्रम होऊ शकणार नाही. लालबागचा राजा मंडळाने अन्नछत्रासाठी पेरू कंपाऊंड उभारलेल्या मंडपालाही मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हा उपक्रम बंद करावा लागला.
Devendra Fadnavis: 'श्रीगणेशा आरोग्याचा' उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी
लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पहिल्या दिवशी पासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. राजाचे दर्शन घेण्यासाठी तासनतास भाविक रांगेत उभे राहत आहेत. नवसाच्या रांगेत भाविक तासनतास उभे राहत असतात. त्यामुळेच मंडळाने या भाविकांना जेवण देण्याचा निर्णय केला होता. त्यासाठी त्यांनी मंडप उभारला होता. मात्र भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलीस तसेच अग्निशमन दलाने या अन्नछत्राला परवानगी देण्यास नकार दिला होता.