जाहिरात

Devendra Fadnavis: 'श्रीगणेशा आरोग्याचा' उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.

Devendra Fadnavis: 'श्रीगणेशा आरोग्याचा' उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी
मुंबई:

गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा' या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर यांचा संयुक्त सहभाग राहणार आहे. याशिवाय मोठ्या संख्येने गणेश मंडळे या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे.

शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार असून, तपासणी दरम्यान आजार आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचार संबंधित योजनांतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, स्थानिक वैद्यकीय महाविद्यालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम सक्रिय सहभागी झाले आहेत.

नक्की वाचा - 'अशा नोकरीची ऐसी की तैसी...' बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर भडकला पोलीस अधिकारी, पाहा VIDEO

नागरिकांना या उपक्रमाची माहिती मिळावी यासाठी मागील आठवडाभर गणेश मंडळांकडून बॅनर, पत्रकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू आहे. परिणामी या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि भाविक पुढे येत आहेत. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना आहे. 

नक्की वाचा - Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय म्हणाले? जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया

‘श्री गणेशा आरोग्याचा' या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत आहे. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार आहेत. हा उपक्रम म्हणजे आरोग्यसेवेतील लोकाभिमुख आणि जनहिताचा उत्तम आदर्श ठरत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख  रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com