पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी आणि पूर्व उपनगरात सुरू होणारी पहिली मेट्रो रेल्वे म्हणून मेट्रो 2B कडे पाहिले जात आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी ते पूर्व उपनगरातील मंडाळे या दोन भागांना हा मेट्रो मार्ग जोडणार आहे. या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा पूर्णपणे तयार झाला असून गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर चाचणी धावही सुरू आहे. हा मार्ग मुंबई मेट्रो 3 चा दुसरा टप्पा अर्थात आचार्य अत्रे चौक वरळी ते कफ करेड आणि नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पणासोबतच सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र हा मार्ग सुरू करण्यासाठीची सगळी सुरक्षा प्रमाणपत्रे न मिळाल्याने हा मार्ग सुरू होण्यात आणखी विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा: मुंबई पूर्व उपनगराला मिळणार पहिली मेट्रो, मंडाले-चेंबूर टप्पा लवकरच सुरू होणार
कधी होणार मेट्रो लाईन 2B चे उद्घाटन ?
मेट्रो लाईन 2B चा पहिला टप्पा अर्थात मंडाळे ते चेंबूर डायमंड गार्डन हा उद्घाटनासाठी सज्ज झाल्याचे सांगण्यात येत आहे. या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 किंवा 31 ऑक्टोबर रोजी या टप्प्याचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पूर्व उपनगरांत धांवणारी ही पहिली मेट्रो ठरणार आहे. पहिला टप्पा हा 5 किलोमीटरचा असून या मार्गावर एकूण 5 स्टेशन्स असणार आहेत.
मेट्रो 2B च्या पहिल्या टप्प्यात कोणती स्थानके आहेत?
- मंडाळे
- मानखुर्द
- बीएसएनएल मेट्रो
- शिवाजी महाराज चौक
- डायमंड गार्डन (चेंबूर)
मेट्रो 2B मार्गावर एकूण किती स्टेशन्स आहेत?
मेट्रो 2B मार्गावर एकूण 20 स्टेशन्स असून हा मार्ग उन्नत मार्ग आहे. या मार्गावरील स्टेशन्स कोणती आहेत ते पाहूया
- एसिक नगर
- प्रेम नगर
- इंदिरा नगर
- नानावटी हॉस्पीटल
- खिरा नगर
- सारस्वत नगर
- नॅशनल कॉलेज
- वांद्रे मेट्रो
- इन्कम टॅक्स ऑफीस
- आयएलएफएस
- MTNL मेट्रो
- स.गो.बर्वे मार्ग
- कुर्ला(पूर्व)
- ईस्टर्न एक्सप्रेस हायवे
- चेंबूर
- डायमंड गार्डन
- शिवाजी महाराज चौक
- बीएसएनएल मेट्रो
- मानखुर्द
- मंडाळे मेट्रो
नक्की वाचा: Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर
मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार
Metro 2B हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर तो विविध मेट्रो मार्गांना जोडला जाणार आहे. मेट्रो 2A हा मार्ग दहीसर आणि अंधेरी डीएन नगरला जोडणारा आहे. मेट्रो 2B सुरू झाल्यानंतर दहीसर ते मंडाळे पर्यंतचे अंतर सुसाट पार करता येणार आहे. हा मार्ग वांद्रे येथे मेट्रो3 च्या जवळ आणणारा असल्याने या मेट्रोमुळे अंधेरीहून दक्षिण मुंबईत जाणेही सोपे होईल. या मेट्रोमुळे कुर्ला पूर्वपर्यंत पोहोचणेही सोपे होणार असल्याने तिथून सध्या बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो 4 आणि चाचणी धाव सुरू असलेल्.या मेट्रो 4A द्वारे मुंबईकरांना ठाणे गाठणे सोपे होईल. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांनाही हा दिलासा देणारा मार्ग ठरणार आहे. याशिवाय चेंबूर मोनो रेल्वे, सीएसएमटी पनवेल कॉरीडॉर, मुंबई- नवी मुंबई विमानतळ फास्ट कॉरीडॉरपर्यंत पोहोचणेही या मेट्रोमुळे सोपे होईल.