रिझवान शेख, मुंबई:
Mulund Metro pillar collapse: मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक मोठा भाग चालत्या रिक्षावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेट्रोच्या खांबाचा काही भाग धावत्या रिक्षावर कोसळला असून यामध्ये 2-3 जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुलूंडमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोचे बांधकाम सुरू असताना पिलरचा एक हिस्सा अचानक निखळला आणि थेट खाली जाणाऱ्या रिक्षावर पडला. शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी १२:२० च्या सुमारास घडली. ही दुर्घटना इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
एकाचा मृत्यू, 3 जखमी
रामधन यादव असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजकुमार इंद्रजीत यादव (वय ४५) हे आयसीयूमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती गंभीरआहे. त्याचबरोबर महेंद्र प्रताप यादव (वय ५२), दीपा रुहिया, (वय ४०) हे जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (MFB), स्थानिक पोलीस, मेट्रो कर्मचारी आणि पालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेमार्फत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mulund Metro Railway Station Slab Collapse | मुलुंड मेट्रो रेल्वे स्टेशनचा स्लॅब कोसळला, दोघं गंभीर जखमी | NDTV मराठी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) February 14, 2026
मुंबई येथील मुलुंड जवळ असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या समोर अनेक वेळा मेट्रोच्या स्लॅब टाकत असताना गर्डर पडून अनेकांचे अपघात देखील झालेले आहे...… pic.twitter.com/Re8lCNFhZp
दरम्यान, या दुर्घटनेमुळे एलबीएस रोडवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, मेट्रो प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जखमींच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे.
वर्दीचं स्वप्न अधुरं! पोलीस भरतीचा सराव करताना अनर्थ घडला, आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा गेला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world