मनोज सातवी, प्रतिनिधी:
Nalasopara Rahul International School Bomb Threat: मुंबईच्या नालासोपारामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नालासोपाऱ्यामधील एका शाळेत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नालासोपारा पश्चिम येथील राहुल इंटरनेशनल स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल (Bomb Threat Mail) मिळाला. ज्यानंतर विद्यार्थ्यांसह शाळा प्रशासन, पालक आणि सुरक्षा यंत्रणांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या नालासोपारा येथील शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकीचा मेल आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पश्चिम येथील राहुल इंटरनेशनल स्कूलला (Rahul International School) बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली ज्यानंतर शिक्षक, विद्यार्थ्यांसह पोलीस प्रशासनांची चांगलीच धावपळ उडाली. बॉम्बच्या धमकीनंतर शाळा तातडीने रिकामी करण्यात आली असून मुलांनाही घरी सोडण्यात आले आहे.
याबाबतची माहिती मिळताच नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यासोबतच बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून शाळेची तपासणी सुरु असून ही धमकी नेमकी कोणी दिली? का दिली? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. या धमकीने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शाळा, रुग्णालये, शासकीय कार्यालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळत आहेत. पुणे, मुंबईमध्ये या धमक्यांच्या मेलचे, फोन्सचे प्रमाण वाढत आहे मात्र तपासामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हा खोडसाळपणा आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.