मुंबई: महामार्गांवर होणारी वाहतूक कोंडी काही नवीन नाही. पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये होणारी वाढती वाहतूक कोंडी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. याच वाहतूक कोंडीवरुन राज्याचे परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मी पहिला शिवसैनिक आहे नंतर मंत्री.. मला ट्रॅफिक दिसली नाही पाहिजे, असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी टोलनाका फोडण्याचा इशाराच दिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागच्या आठवड्यात दहिसर टोल नाक्यावर पाहणी दौरा केला होता. त्यावेळी वाहतूक कोंडी सुटण्यासाठी त्यांनी काही सूचना दिल्या होत्या. मात्र ठेकेदारकडून त्यांची पूर्तता न केल्याने आज दुपारी पुन्हा एकदा प्रताप सरनाईक दहिसर टोल नाक्यावर दाखल झाले.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक ठेकेदारावर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. "मी पुढच्या आठवड्यात पुन्हा येणार आहे, त्यावेळी मला वाहतूक कोंडी दिसली तर मी स्वतः टोल नाका फोडणार आणि गुन्हा देखील दाखल करणार असा सज्जड दम मंत्री सरनाईक यांनी दिला. मी पुन्हा चार दिवसांनी येईन, तुम्हाला शनिवारपर्यंत वेळ देतो, मी बोलतो ते करतो, इकडे गवत उपटायला येत नाही," अशा शब्दात त्यांनी ठेकेदाराला सज्जड दम दिला.
( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
तसेच 'मला खोटं बोललेल आवडत नाही, मी लोकांसाठी आलेलो आहे, लोकांना याचा त्रास होतो. मी काही वसुलीमध्ये डिस्काऊंट मागितला नाही. जर शनिवारी मला बदल दिसला नाही तर स्वत: टोलनाका फोडीन, मी मंत्री नंतर आधी शिवसैनिक आहे,' असा इशाराही प्रताप सरनाईक यांनी दिला. परिवहन मंत्र्यांच्या या रौद्रावताराची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.