दिल्ली आणि बंगळुरूनंतर मुंबईतही प्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचत असल्याने नागरिक चिंतेत आहे. दिल्लीच उदाहरण समोर असताना वेळीत प्रदूषणावर नियंत्रण आणलं नाही तर मोठं संकट उभं राहू शकतं. यासाठी महापालिका आता अॅक्शन मोडवर आली आहे. मुंबईत प्रदूषण वाढल्यानं मुंबईतल्या बेकऱ्या महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. बेकरीच्या भट्टीमधून बाहेर पडणारा धूर मुंबईतलं प्रदूषण वाढवत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेनं बेकऱ्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. मुंबईतल्या बेकऱ्यांना अत्याधुनिक करून त्यांचं प्रदूषण थांबणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेनं मुंबईतल्या बेकरींना नोटिसा पाठवल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातल्या बेकऱ्यांमधून बाहेर पडणारा धूर मुंबईचं प्रदूषणात भर घालत असल्याचं दिसत आहे. मुंबईतील निम्म्याहून अधिक बेकऱ्यांमधल्या भट्ट्यांमध्ये आजही लाकडाचा वापर केला जातो, त्यामुळे प्रदूषण वाढत असल्याचं दिसतं. त्यामुळेच या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व बेकरी चालकांनी इलेक्ट्रिक किंवा पीएनजी गॅसचा वापर करावा, अन्यथा बेकरी बंद करण्यात येईल अशा नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या या सूचनेवर बेकरी चालकही सकारात्मक आहेत. मात्र इलेक्ट्रिक किंवा गॅस पाईपलाईन बसवण्यासाठीच्या खर्चामध्ये सरकारनं अनुदान देण्याची त्यांची मागणी आहे. अन्यथा बेकरी उत्पादनांच्या किमतीत वाढ करावी लागणार असल्याचं सांगितलं जातं.
नक्की वाचा - Kolhapur Crime : मामाकडून भाचीचं लग्न उद्ध्वस्त करण्याचा घाट, जेवणात घातलं विष; कारण ऐकून पाहुण्यांचा संताप!
मुंबईत दररोज जवळपास पाच कोटी पाव लागतात. लहान बेकरींमध्ये दररोज सुमारे 100 किलो लाकूड इंधन म्हणून वापरलं जातं तर मोठ्या बेकरींमध्ये सुमारे 250 ते 300 किलो लाकूड इंधन म्हणून वापरलं जातं. जेव्हा भंगार लाकूड इंधन म्हणून वापरलं जातं. तेव्हा मिथेन, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईडसारखे हानिकारक वायू बाहेर पडतात. त्यातून श्वसनाचे आजार आणि दमा यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.
बेकरी पदार्थांचे भाव वाढणार?
मुंबईतल्या बेकरीमध्ये बनणारे पाव, टोस्ट, खारी बटर हे मुंबईकरांच्या नाश्त्याचे पदार्थ आहेत. आता लाकडी भट्ट्या ते इलेक्ट्रिकल भट्टी असा बदल बेकरी मालकांना करावा लागणार आहे. हा बदल बेकरी आणि सरकारच्या सहकार्यानं सुटला तर ठीक. अन्यथा बेकरी पदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.