सुरज कसबे, पुणे: लोणावळ्यातील जुना पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात बॅटरी हील आणि अमृतांजन पुल यांच्या दरम्यान विचित्र अपघात झाला. एका मालवाहू ट्रकने पाच वाहनांना धडक दिली असून या धडकेत बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी मध्यरात्री मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटामधील वाघजाई मंदिर येथील तीव्र उतारावरून उतरत असताना ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या मालवाहू ट्रकने वाटेत आलेल्या प्रवासी रिक्षा, इनोव्हा कार, आयआरबी कंपनीसाठी काम करणारा पुलर, इर्टीगा कार, आणि टाटा पंच गाडीला धडक दिली. त्यानंतर एका सुरक्षा भिंतीला धडकून हा ट्रक थांबला. या धडकेत इर्टीगा आणि इनोव्हा या दोन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.
दुर्दैवाने या अपघातात, ज्या बाप आणि लेकीचा या अपघातात मृत्यू झाला ते दोघे इर्टीगा या गाडीत बसलेले होते. घटनेची खबर मिळतात खंडाळा आणि बोरघाट महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सदस्य व बॅटरी हील परिसरातील रहिवाशांच्या मदतीने अपघातग्रस्त गाड्यांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले.
ट्रेंडिंग बातमी - Cidco News: सिडकोसमोर मोठे संकट! 21,000 विजेत्यां पैकी किती जणांनी भरली कन्फर्मेशन अमाऊंट?
दुर्घटनेतील जखमींना तातडीने लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटल व खंडाळा येथील डॉ. चंपक हॉस्पिटलमध्ये रवाना केले. क्रेनच्या मदतीने सर्व अपघातग्रस्त वाहने मार्गावरून बाजूला करीत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा चालक फरार झाला असल्याने ट्रकचा ब्रेक फेल झाला होता की चालकाच्या चुकीमुळे ही दुर्दैवी घटना घडली हे नेमकं स्पष्ट झाले नाही. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहे.