Lonavala Ekvira Aai Yatra 2026: राज्यभरातील आगरी कोळी बांधवांची कुळदेवता असलेल्या लोणावळा येथील एकविरा देवीची यात्रा आजपासून सुरु होत आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी तीन दिवस ही यात्रा चालणार आहे. या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अन् आनंदाची बातमी समोर आली आहे. एकविरा यात्रेनिमित्त मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर तीन दिवस टोल माफी करण्यात आली आहे. या टोल माफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचे पत्र आवश्यक असणार आहे.
मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर तीन दिवस टोल माफ...!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोणावळा येथील एकविरा आईच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी खासदार सुरेश म्हात्रे यांनी टोल माफची सेवा दिली आहे. याबाबत सुरेश म्हात्रे यांनी सांगितले की, मुंबई- पुणे एक्स्प्रेसवरील टोल प्रशासनाची मी भेट घेत त्यांना टोल माफीबाबत विनंती केली. त्यांनीही माझी विनंती मान्य करत टोल माफ करण्याचे आश्वासन दिले असून त्यासाठी माझ्या संमतीचे पत्र आवश्यक आहे. माझ्या ऑफिसमधून ते पत्र घेऊन जावा आणि दर्शनासाठी जाताना सुरक्षितपणे प्रवास करा. आपला प्रवास आणि सुरक्षितता महत्वाची आहे. येत्या मंगळवार, बुधवार, गुरुवार ही टोलमाफी असेल. यात्रेनिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा.
अहिल्यानगरची लेक भोंदूबाबाचा काळ ठरणार; 'खरात'चा छडा लावणाऱ्या IPS तेजस्वी सातपुतेंचा जबरदस्त इतिहास
यात्रेनिमित्त पोलीस प्रशासन सज्ज!
लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेच्या निमित्ताने मावळ प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या सह पुणे ग्रामीण पोलीस दलातील लोणावळा ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून, यात्रेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी हार-फुलांच्या दुकानांना मागे हलवण्यात आले आहे. जेणेकरून पायऱ्या मोकळ्या राहतील. कार्ला फाटा ते गडपायथा दरम्यान जड वाहनांना पूर्णतः बंदी असेल. भाविकांना गडावर फटाके नेण्यास मज्जाव करण्यात आला असून, शोभेचे आणि रंगांचे फटाके नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तर जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक देखील यात्रा काळात बंद ठेवण्यात आली आहे. ही चैत्री यात्रा धार्मिक उत्साहाने साजरी करण्यासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.