जाहिरात

Ashok Kharat Property : अशोक खरातची संपत्ती पाहून तपास यंत्रणाही चक्रावली; 'खरात फाईल्स'ची भलीमोठी यादी

अशोक खरातनं गावोगावी हजारोंची माया जमवली आहे. अशोक खरातची संपत्ती किती हे समजल्यावर डोळे पांढरे होतील.

Ashok Kharat Property : अशोक खरातची संपत्ती पाहून तपास यंत्रणाही चक्रावली; 'खरात फाईल्स'ची भलीमोठी यादी

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत दिवसेंदिवस धक्कादायक बाबी समोर येत आहे. समस्या घेऊन आलेल्या भक्तांना तंत्र-मंत्राचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत घृणास्पद कृत्य करीत असल्याच्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. दरम्यान हजारो लोकांची फसवणूक करुन खरातने हजारो कोटींची संपत्ती जमा केल्याचं समोर आलं आहे. अशोक खरातची संपत्ती २०० नाही तर तब्बल २ हजार कोटींच्या घरात असल्याचं समोर आलं आहे. डोळे पांढरे करणाऱ्या खरात फाईल्समधून भोंदूबाबाने 500 व्हिडिओ आणि २ हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं होतं.  

शिर्डीमधील साई सिल्व्हर ओक लॉन्स ही संपत्ती अशोक खरातची आहे. या भव्य प्रॉपर्टीचा मालक अशोक खरात आहे. अशोक खरातनं गावोगावी अशी माया जमवली आहे. अशोक खरातची संपत्ती किती हे समजल्यावर डोळे पांढरे होतील. हा राजकीय ज्योतिषी आणि बलात्कारी भोंदूबाबा तब्बल २ हजार कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या मालमत्तेचे आकडे पाहून तपास यंत्रणाही चक्रावल्या आहेत.  

खरातच्या संपत्तीचा सातबारा 

  • नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत खरातच्या तब्बल ५२ मालमत्ता आहेत... 
  • पाथर्डीत १५० कोटींची ३० एकर जमीन
  • सिन्नरच्या कहांडळवाडीत ५ कोटींची ४५ एकर जमीन
  • पाथर्डी, गौळाणेत ३० कोटींहून अधिक किमतीची जमीन
  • गौळाणेत मोक्याच्या जागी १५ भूखंड
  • सिन्नरमध्ये १ कोटीचे २ व्यापारी गाळे
  • मीरगावात १० कोटींहून जास्त किमतीचे फार्म हाऊस
  • अहिल्यानगरमध्ये ५ एकरांचा कोट्यवधींचा भूखंड
  • ओझर विमानतळाजवळ ५ कोटींची जमीन
  • जानोरी, दहावा मैल भागात मोक्याचे भूखंड
  • नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरवर सुमारे एक कोटीचं ऑफिस
  • कर्मयोगीनगरमध्ये ५ कोटींचा बंगला
  • शिर्डीच्या पानमळ्यात ३० गुंठ्यांची कोट्यवधींची जागा
  • निघोजमध्ये ४ एकरांची कोट्यवधींची जागा
  • शिर्डीमध्ये ७० कोटींचे प्लॉट
  • मिरगावातल्या घरी लाखोंची कॅश
  • वेगवेगळ्या ठिकाणी ३० फ्लॅट
  • सिन्नरमध्ये महत्त्वाच्या जागांवर दुकानं
  • आणि ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टची दोन कोटींची वार्षिक उलाढाल

नक्की वाचा - हिवरे बाजारात पाणीटंचाईवर खरातकडून सिद्धपूजा, ओशनोलॉजीचं कौतुक; पोपटराव पवारांचं 18 मिनिटांचं भाषण चर्चेत

बड्या गुंतवणूकदाराकडून मदत

अशोक खरातची ही माहीत असलेली प्रॉपर्टी आहे. त्याच्या पत्नीच्या नावावरही बऱ्याच मालमत्तांची नोंद आहे. अशोक खरातची मालमत्ता खरेदी करताना एक विशिष्ट मोडस ऑपरेंडी होती. अशोक खरात बड्या गुंतवणूकदाराला हाताशी धरायचा. दोघांमध्ये मिळून मालमत्ता खरेदी करायचा. दोन कोटींचा जमीन व्यवहार असेल, तर खरात फक्त २० लाख रुपये गुंतवायचा. उर्वरित १ कोटी ८० लाख समोरच्याला गुंतवायला सांगायचा. त्यानंतर सातबारा उताऱ्यावर जमीन सामाईक पद्धतीने घेतली असल्याची नोंद करायचा. अशा पद्धतीने खरातने कवडीमोल भावात कोट्यवधींच्या जमिनी स्वतःच्या नावावर केल्याचं सांगितलं जात आहे.

भोंदूबाबा अशोक खरातची नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातच जवळपास 500 कोटीहून जास्त किमतीची मालमत्ता आहे. अनेक ठिकाणच्या जमिनी खरातनं धमक्या देऊन बळकावल्या आहेत. नाशिकच्या पाथर्डी शिवारातला एक भूखंडही खरातच्या नावावर आहे.  अशोक खरात प्रकरणात 500 व्हिडीओ आहेत आणि त्याचं तब्बल २ हजार कोटींचं साम्राज्य असल्याचा दावा असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. इतकच नाही तर खरातच्या जाचामुळे शिर्डीतल्या तिघांनी आत्महत्या केल्याचंही बोललं जातंय. खरातचा शिर्डीतल्या मालमत्तांवर डोळा होता. 

खरातच्या जाचातून तिघांची आत्महत्या...

शिर्डीतल्या एका कुटुंबाला खरातनं सावकारीतून कर्ज दिलं होतं. या कुटुंबीयांच्या मालकीचं शिर्डीमध्ये एक लॉन्स म्हणजे बगीचा होता. खरातनं जास्त व्याजदरानं आर्थिक संकटात सापडलेल्या या कुटुंबाला कर्ज दिलं होतं. या कुटुंबानं कर्ज फेडलं. तरीही खरातकडून वसुलीसाठी तगादा लावला जात होता. नेते, मंत्री, अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचं सांगून त्या कुटुंबाला धमकावलं जायचं. अखेर या कुटुंबानं त्यांच्या मालकीचं लॉन खरातच्या नावावर करुन दिलं. मात्र खरातच्या त्रासाला कंटाळून या कुटुंबातल्या दोघांनी आणि खरातनं सावकारी कर्ज दिलेल्या आणखी एकानं अशा तिघांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com