अविनाश माने, मुंबई:
Bhandup Rain Shocking CCTV Footage: गेल्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. राजधानीमध्ये पडलेल्या या धुवांधार पावसाने रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूकही ठप्प झाली. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना वाट शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच भांडुपमध्ये पावसाच्या पाण्यातून चालताना विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका सतरा वर्ष तरुणाच्या जीवावर बेतले आहे. पाण्यातून मार्ग काढताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये ही घटना घडली. दीपक पिल्ले असे या मृत तरुणाचे नाव आहे.
Jalgaon News: एकाच कुटुंबातील 5 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, जळगावातील हृदयद्रावक घटना
दीपक हा एल बी एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता. परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती. त्या मधून झालेल्या विजेचा प्रवाहामुळे शॉक लागून दिपकचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे आसपास असलेल्या लोकांनी त्याला आवाज देण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हेडफोन घातल्याने त्याला ऐकू आले नाही.
प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक याने कानात हेडफोन घातले होते. येथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिले, परंतु कानातल्या हेडफोन मुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या वायरच्या संपर्कात गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे येथील नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक जणांना सूचना करून येथून बाजूला जाण्यास सांगितलं होतं. त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण येथील स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले.