Mumbai Rain Alert: मुंबईकरांसाठी एक अत्यंत मोठी अन् महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दिनांक ४ जुलै २०२६ रोजी दुपारच्या सत्रा सुटी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईतील शाळांना सुट्टी
आज दिनांक 4 जुलै 2026 रोजी अतिवृष्टी विषयक हवामान खात्याच्या अहवालानुसार नुसार माननीय आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे आदेशानुसार शाळांना दुपार सत्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. शाळेत आलेले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचतील याबाबत मुख्याध्यापक शिक्षकांनी दक्षता घ्यावी, असे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पुढील पाच दिवस पावसाचे....
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी पुढील 5 दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, 04 आणि 05 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. हवामान खात्याने 7 जुलैपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world