Mumbai Rain Alert: मुंबईसह राज्यभरात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई तसेच ठाणे पालघरमध्ये तुफान पाऊस बरसत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेली पावसाची संततधार आजही सुरु राहणार आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात आज, रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईसह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार
भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात आज, रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. तसेच, उद्या दुपारी ३.२२ वाजता समुद्राला ४.१९ मीटर उंचीची भरती आहे. त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार घाटमाथ्यांवर ६ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
मुंबईत जोरदार पावसाची नोंद
बृहन्मुंबई क्षेत्रातील विविध भागांमध्ये मागील २४ तासांत सुमारे २५० ते ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे प्रमाण जुलै महिन्याच्या सरासरीच्या ७४ टक्के असून वार्षिक हंगामाच्या २५ टक्के इतके आहे. या कालावधीदरम्यान समुद्राला मोठी भरती आणि संततधार पाऊस सुरू असूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत राहिले.
सुमारे १० सखल भागांच्या ठिकाणी पाणी साचण्याची तसेच १८ झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तथापि, त्यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १० हजार अधिकारी, कर्मचारी कार्यक्षेत्रांवर (ऑन ग्राऊंड) अविरतपणे कार्यरत आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारी देखील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
या कालावधीत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे मुंबईत झाडांच्या व फांद्यांच्या अनुषंगाने १०३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १८ तक्रारी झाडे पडल्याच्या होत्या. एकूण १७ घरे व भिंती पडल्याच्या घटनांची देखील नोंद झाली होती. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे १० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त झाल्या. मात्र, संबंधित ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेळीच उपाययोजना करुन पाण्याचा निचरा केला.