मनोज सातवी
मुंबई उच्च न्यायालयाने 11 जुलै 2006 रोजी झालेल्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे त्या दुर्दैवी घटनेची जखम पुन्हा ताजी झाली आहे. आम्ही न्यायासाठी 18 वर्ष वाट पाहिली, पंरतु आजच्या निकालाने आमच्या पदरी निराशा आली, अशी प्रतिक्रीया या स्फोटात आपला मुलगा गमावलेल्या शवंत भालेराव यांनी व्यक्त केली आहे. सरकारने योग्य तपास न केल्यानेच आरोपी निर्दोष सुटले, असा आरोपही त्यांनी केला आहे. 7/11 स्फोटात त्यांनी आपला 23 वर्षांचा मुलगा हर्षल भालेराव याला गमावलं होतं. त्यांनी आपल्या मुलाची आठवण कायम रहावी यासाठी आपल्या घराला ‘7/11 हर्षल स्मृती' असे नाव दिले आहे. या स्फोटाच्या खटल्याचा निकाल आज लागला. त्यावेळी त्यांच्या लेकाच्या आठवणी पुन्हा ताजा झाल्या.
मुलगा परत येणार नाही, पण दहशतवाद्यांना शिक्षा मिळायला हवी होती. न्याय मिळायला हवा होता अशी अपेक्षा हर्षलच्या आई सगुणा भालेराव यांनी ही व्यक्त केली आहे. तर वडील शवंत भालेराव यांनी हा दुर्दैवी निकाल आहे असं म्हटलं आहे. ज्या वेळी हा स्फोट झाला होता त्यावेळी ही आपण प्रतिक्रीया दिली होती. तपास यंत्रणांनी थातूरमातूर पुराव्या आधारे कुणाला ही अटक केली होती असा आरोपही त्यांनी केला. त्यावेळी ही बोललो होतो. निकालानंतर मनाला वाईट वाटत आहे. सरकारी यंत्रणेची ही घोडचूक आहे. त्यामुळेच ते निर्दोष सुटले, असं ही ते म्हणाले.
हर्षलच्या स्मृतीमध्ये दरवर्षी समाजातील लोक एकत्र येतात असं ही ते म्हणाले. त्याला श्रद्धांजली वाहतात. ज्या दिवशी ट्रेनमध्ये स्फोट झाला तो त्याचा कामाचा पहिला दिवस होता. त्याच्यात कामावर जाण्याचा उत्साह होता. तो त्या दिवशी सकाळी लवकर उठला. वडीलांना हॅलो करून निघाला. आईला संध्याकाळी लवकर घरी येतो असं सांगितलं. ऑफीसला गेल्यावर घरी फोन करून ही सांगितलं की मी पोहोचलो आहे. त्या दिवशी त्याने अंधेरीहून बोलीवलीला जाणारी ट्रेन संध्याकाळी पकडली. त्याच ट्रेनमध्ये स्फोट झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. कामाचा पहिला दिवस त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला.
11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला. 19 वर्षांनंतर या बहुचर्चित हल्ल्यातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच साक्षीदारांच्या जबाबात तथ्य आढळले नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणी पाच जणांना फाशी तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दोषींनी त्यांच्या शिक्षेला आणि शिक्षेला आव्हान दिले होते. 11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी मुंबईच्या उपनगरीय लोकल रेल्वेत सात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 209 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 827 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. या प्रकरणात, महाराष्ट्र एटीएसने एकूण 13 आरोपींना अटक केली, तर 15 जणांना फरार घोषित करण्यात आले.