Mumbai Dam: मुंबईच्या धरणांमध्ये केवळ 7 टक्के पाणीसाठा; 146 वर्षांतील सर्वात कोरड्या जूनचा बसला मोठा फटका

Mumbai dams water levels :  मान्सूनच्या सुरुवातीच्या अनिश्चिततेमुळे सध्या राज्यासमोर एक मोठे जलसंकट उभे राहिले आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Mumbai dams water levels : हा तब्बल 146 वर्षांमधील सर्वात कोरडा जून महिना ठरला आहे.
मुंबई:

तन्मय टिल्लू, प्रतिनिधी 

Mumbai dams water levels :  मान्सूनच्या सुरुवातीच्या अनिश्चिततेमुळे सध्या राज्यासमोर एक मोठे जलसंकट उभे राहिले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी पातळी अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचली असून ग्रामीण भागातही परिस्थिती बिकट होत चालली आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली, तरी धरणांमधील पाणी साठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही.

मुंबईकरांच्या चिंतेत मोठी वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात मुख्य धरणांमधील एकूण पाणीसाठा आता केवळ 7 टक्क्यांवर आला आहे. संपूर्ण जून महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. देशाच्या हवामान इतिहासातील हा तब्बल 146 वर्षांमधील सर्वात कोरडा जून महिना ठरला आहे. सुरुवातीला पडलेला पाऊस जमिनीत शोषला गेल्याने धरणांमध्ये त्याचा तातडीने कोणताही सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. सध्या या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 14.47 दशलक्ष लीटर असताना, त्यात फक्त 1 लाख 279 दशलक्ष लीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

Advertisement

धरणांमधील पाण्याची ताजी स्थिती

मुंबईला पाणी देणाऱ्या अप्पर वैतरणा धरणातील वापरण्यायोग्य पाणीसाठा सध्या 0 टक्के झाला आहे. मोडक सागर धरणात 18.47 टक्के तर मध्य वैतरणा धरणात क्षमतेच्या केवळ 11.53 टक्केच साठा उरला आहे. भातसा धरणातील साठा 6 टक्क्यांहूनही खाली घसरला असून तानसा धरणही जवळजवळ रिकामे झाले आहे. इतर सर्व धरणांमधील पाण्याची सरासरी पातळी खालावून थेट 6.93 टक्क्यांवर आली आहे. केवळ विहार आणि तुळशी या दोन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तिथल्या साठ्यात काहीशी वाढ झाली असून विहारमध्ये 45.13 टक्के आणि तुळशीमध्ये 24.26 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने आता सर्वांच्या नजरा जुलै महिन्यातील पावसाकडे लागल्या आहेत.

( नक्की वाचा : Kharif Crop Planning: अल निनोच्या संकटात शेती वाचवणार 'हा' फॉर्म्युला; यंदाच्या खरिपात 'या' पिकांची करा निवड )
 

पुणे विभागात सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती

दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पाणी संकट अधिक तीव्र होताना दिसत आहे. राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती पुणे विभागात असून, तिथल्या धरणांमध्ये केवळ 13.57 टक्केच पाणी उरले आहे. नाशिक विभागातील धरणांमध्ये 24.13 टक्के आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 24.74 टक्के साठा आहे. 

कोकण विभागात 27.93 टक्के, नागपूर विभागात 30.58 टक्के तर अमरावती विभागात 37.64 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी 174 मिलिमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा केवळ 27 टक्के पाऊस झाला असून ही गेल्या 10 वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद आहे.

( नक्की वाचा : Monsoon Prediction निसर्गाची अद्भूत शक्ती! 'या' पक्ष्याच्या अंड्यांवरून ठरतो मान्सूनचा काळ; वाचा काय आहे पद्धत )
 

 विदर्भात पावसाचा जोर

राज्यातील काही भागात मात्र गेल्या दोन दिवसांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि भीमाशंकर परिसरात झालेल्या पावसामुळे ओढे, नाले प्रवाहित झाले असून भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. विदर्भातील गडचिरोली शहरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंडारा जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस आल्याने रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. 

Advertisement

बुलडाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह दोन तास झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून काही ठिकाणी शेते पाण्याखाली गेली आहेत. अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील 'मेघा' नदीला मोठा पूर आला असून, संरक्षक भिंत फुटल्याने शिरसगाव कसब्यातील आठवडी बाजारात पाणी शिरले. यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

कुठे फटका तर  बळीराजाची चिंता

मुंबईनजीकच्या नवी मुंबईतील उलवे, नेरूळ, सानपाडा, वाशी, बेलापूर आणि जुईनगर परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने नेरूळ ते जुईनगर दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आणि सकाळी कामावर जाणाऱ्या मंडळींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Advertisement

रत्नागिरीत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाने नाणेली गावातील एका घराचे पत्रे उडवले, तर असणिये गावात घरावर नारळाचे झाड पडून सुमारे 20000 रुपयांचे नुकसान झाले आहे.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पेरणीची लगबग

दुसरीकडे शेतीचा विचार केला तर बीड जिल्ह्यात अद्याप पेरणीसाठी अपेक्षित असा समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र, वेळ निघून जाऊ नये म्हणून शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. उशिरा पेरणी केल्यास उत्पादन घटण्याची भीती आणि आता पेरणी केल्यास पाऊस दगा देण्याची चिंता अशा विवंचनेत बीडचा शेतकरी आहे. याउलट हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेगाने सुरुवात झाली आहे. 

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातही समाधानकारक पावसामुळे आधुनिक यंत्रसामग्रीसह पारंपरिक बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी आणि पेरणीच्या कामांना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मान्सून संपूर्ण राज्यात पूर्णपणे सक्रिय होईपर्यंत अनेक भागांना अजूनही टँकरवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
 

Topics mentioned in this article