मोबाइल आणि सोशल मीडियामुळे आपण एकमेकांच्या खूप जवळ आलोय. अगदी कधीही एकमेकांना पाहता येतं, बोलता येतं... त्यात सोशल मीडियामुळे तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट एकाचवेळी हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचत असते. अगदी प्रत्येक अपडेट... मात्र या सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेलं आपण वास्तवापासून आणि माणुसकीपासून कधी दूर जातो हे लक्षातही येत नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डेटाच्या जगातील हे जळजळीत वास्तव संगीतकार, कवी सलील कुलकर्णीने आपल्या कवितेतून व्यक्त केलं आहे. 'नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो' ही कविता सलील कुलकर्णीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. सोशल मीडियावरुन अनेकांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. एखाद्याला वाईट बोलताना त्याच्या भावनेचा विचारही केला जात नाही. बनावटी चेहरे चढवलेले आपण समोरच्याचे वाभाडे काढण्यात धन्यता मानत असतो. प्रसंगी त्याचा आनंद घेत असतो.
नक्की वाचा - Phule Movie 'मी स्वतः ब्राह्मण, माझ्याएवढा स्ट्राँग...' फुले चित्रपटावर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
सलील कुलकर्णीने बातमीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिलंय, एक निरीक्षण… अशा निनावी , आणि चेहरे नसलेल्या माणसांचं. कुठून येतात ही माणसं ? कुठून येते ही वृत्ती ? कोणाविषयीच आदर न वाटणारी. ते एखादंच वाईट वाक्य बोलतात. पण जो ऐकत असतो, त्याने ऐकलेलं त्या दिवसातले 100 वे वाईट वाक्य असेल आणि त्याचा तोल ढळला तर? तो जगण्यावर रुसला तर? अशी भीती सुद्धा वाटत नाही ह्यांना? या वृत्तीच्या माणसांच्या मनातल्या अंधारात डोकावून पाहायचा प्रयत्न करतांना ही कविता सुचली.
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो
रोज वेगळं नाव लावून लपून लपून भुंकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे
याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही
कोणी इथं तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही
ज्ञान नको, विषयाची जाण नको
आपण नक्की कोण, कुठले; ह्याचे सुद्धा भान नको
खूप सारी जळजळ हवी
विचारांची मळमळ हवी
दिशाहीन त्वेष हवा
विनाकारण द्वेष हवा
चालव बोटे धारदार
शब्दांमधून डंख मार
घेरून घेरून एखाद्याला
वेडा करून टाकीन म्हणतो...
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे...
खाटेवरती पडल्या पडल्या
जगभर चिखल उडव
ज्याला वाटेल, जसं वाटेल
धरून धरून खुशाल बडव
आपल्यासारखे आहेत खूप
खोटी नावे, फसवे रूप
जेव्हा कोणी दुबळे दिसेल
अडचणीत कोणी असेल
धावून धावून जाऊ सारे
चावून चावून खाऊ सारे
जोपर्यंत तुटन नाही
धीर त्याचा सुटत नाही
सगळे मिळून टोचत राहू
त्याच्या डोळ्यात बोचत राहू
धाय मोकलून रडेल तो
चक्कर येऊन पडेल तो
तेवढ्यात दुसरं कोणी दिसेल
ज्याच्या सोबत कोणी नसेल
आता त्याचा ताबा घेऊ
त्याच्यावरती राज्य देऊ
मग घेऊन नवीन नाव
नवा फोटो, नवीन डाव
त्याच शिव्या, तेच शाप
त्याच शिड्या, तेच साप
वय, मान, आदर, श्रद्धा
सगळं खोल गाडीन म्हणतो
जरा कोणी उडलं उंच
त्याला खाली पाडीन म्हणतो
थोडा डेटा खूप मजा
छंद किती स्वस्त आहे
एका वाक्यात खचतं कोणी
फीलिंग किती मस्त आहे
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे...
– सलील कुलकर्णी